
मुंबई : बॉलिवूडमध्ये संजय दत्तने त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. त्याच्या सिनेमांइतकीच त्याची वैयक्तिक लाईफही नेहमीच चर्चेत राहिली. नुकतंच एका पॉडकास्टमध्ये बोलताना संजयने आपल्या आयुष्यातल्या या जुन्या आणि वेदनादायी आठवणींना उजाळा दिला.
या गप्पांमध्ये संजयने त्याचा जेलमधला काळ, दिवंगत वडील सुनील दत्त यांच्यासोबतचं नातं आणि वर्षानुवर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईत स्वतःला कसं सावरलं, यावर मनमोकळेपणाने भाष्य केलं.
पोलिसांकडून पहिल्यांदा हातकडी लागली, तो क्षण संजयसाठी खूपच भावनिक होता. विशेष म्हणजे त्यावेळी त्याचे वडील सुनील दत्त समोरच होते. आपल्या मुलाला अशा अवस्थेत घेऊन जाताना पाहून सुनील दत्त यांना मोठा धक्का बसला होता आणि ते अक्षरशः कोसळले होते.
संजयने सांगितलं की, त्यावेळी त्याने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. 'हातकडी लावणं हा फक्त प्रक्रियेचा एक भाग आहे', असं सांगून त्याने वडिलांना धीर दिला. पण वरवर शांत दिसणाऱ्या संजयच्या मनात त्यावेळी खूप मोठी खळबळ उडाली होती.
वडिलांसमोर आपण रडलो, तर त्यांना आणखी त्रास होईल, म्हणून संजयने स्वतःचं दुःख लपवलं. या प्रदीर्घ कायदेशीर लढाईत टिकून राहण्यासाठी कुटुंबासाठी खंबीर उभं राहणं, हेच त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं.
बॉलिवूडमधल्या एका मोठ्या कुटुंबात जन्मूनही संजयला आपल्या स्टारडमचा कधीच गर्व वाटला नाही. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, असा विचार त्याने कधीच केला नाही.
जेलमधल्या दिवसांबद्दल बोलताना तो म्हणाला की, त्याने इतर कैद्यांना त्यांच्या पार्श्वभूमीवरून कधीच वेगळी वागणूक दिली नाही. त्याच्या या साधेपणाचं श्रेय तो त्याच्या जडणघडणीला आणि शालेय संस्कारांना देतो.
शूटिंगच्या सेटवरही तो अनेकदा खाली जमिनीवर बसून कामगारांसोबत जेवायचा. त्याच्या मते, माणसाचा दर्जा किंवा त्याची पोझिशन या गोष्टी लोकांपासून दूर जाण्याचं कारण असू शकत नाहीत.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांशी संबंधित शस्त्रास्त्र प्रकरणात संजय दत्तला आर्म्स ॲक्टखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या पॉडकास्टमध्ये शेखर सुमन यांनी संजयला जेलमधल्या कठीण परिस्थितीबद्दल विचारलं. 'त्यावेळी कधी आत्महत्येचा विचार मनात आला होता का?', असा थेट प्रश्न त्यांनी विचारला.
यावर संजयने ठामपणे 'नाही' असं उत्तर दिलं. आपल्यामुळे कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला, याची त्याला जाणीव होती. पण तरीही त्याने स्वतःला कधीच पूर्णपणे खचू दिलं नाही.
शेखर सुमन यांनी संजयच्या आयुष्यातल्या अनेक संकटांची आठवण करून दिली. आई नर्गिस आणि वडील सुनील दत्त यांचं निधन, पहिली पत्नी रिचा शर्माचा मृत्यू, व्यसनमुक्ती केंद्र, जेलची हवा आणि स्टेज-फोर कॅन्सरशी दिलेली झुंज, या सगळ्याचा त्यांनी उल्लेख केला.
एवढ्या सगळ्या संकटांचा सामना करूनही संजय दत्तने आपलं काम सुरूच ठेवलं आणि आजही तो बॉलिवूडचा एक लोकप्रिय स्टार आहे. त्याच्या या ताज्या मुलाखतीतून त्याच्या पडद्यामागच्या खऱ्या आणि खंबीर व्यक्तिमत्त्वाची ओळख चाहत्यांना झाली आहे.