Akshara Haasan : १० वीत ३ वेळा नापास, तरीही कमल हासनच्या लेकीचं 'हे' आहे सर्वात मोठं स्वप्न

Published : Oct 04, 2026, 10:20 AM IST
Akshara Haasan : १० वीत ३ वेळा नापास, तरीही कमल हासनच्या लेकीचं 'हे' आहे सर्वात मोठं स्वप्न

सार

कमल हासन यांची धाकटी लेक अक्षरा हासन हिने नुकतंच तिच्या शिक्षणाबद्दल आणि करिअरबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. १० वीत सलग तीन वेळा नापास होऊनही, एक उत्तम दिग्दर्शिका बनण्याचं तिचं अंतिम ध्येय आहे.

मुंबई : स्टार किड्स म्हटलं की त्यांना सिनेसृष्टीत सगळं काही आयतं मिळतं, असा अनेकांचा समज असतो. पण सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते, असं अभिनेत्री अक्षरा हासन सांगते. कमल हासन आणि सारिका यांची धाकटी लेक आणि श्रुती हासनची बहीण असलेल्या अक्षराने नुकतंच एका पॉडकास्टमध्ये तिच्या शिक्षणाबद्दल, करिअर आणि कुटुंबाबद्दल अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत.

१० वीत ३ वेळा नापास...

अक्षराने तिच्या शिक्षणाबद्दल कोणतीही लपवाछपवी न करता स्पष्टपणे सांगितलं. शाळेत असताना अभ्यासात आपण फार हुशार नव्हतो, हे तिने प्रामाणिकपणे कबूल केलं. दहावीच्या परीक्षेत सलग तीन वेळा नापास झाल्यावर, आता पास होणं आपल्याच्याने शक्य नाही हे ओळखून तिने शिक्षण अर्धवट सोडलं. आजकालचे सेलिब्रिटी स्वतःचे अपयश सांगायला कचरतात, पण अक्षराने मात्र अगदी बिंधास्तपणे ही गोष्ट सांगितली आहे.

कोरिओग्राफर ते असिस्टंट डायरेक्टर...

एका मोठ्या स्टार फॅमिलीतून येऊनही आपण थेट हिरोईन झालो नाही, असं अक्षरा सांगते. सुरुवातीला डान्सची आवड असल्याने तिने मित्रांच्या म्युझिक व्हिडिओंसाठी कोरिओग्राफी करत करिअरची सुरुवात केली. त्यानंतर सिनेमांची आवड निर्माण झाली आणि तिने दिग्दर्शनाकडे मोर्चा वळवला. 'सोसायटी' आणि 'शाबास नायडू' या सिनेमांसाठी तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. अभिनयातही एकदा नशीब आजमावून पाहावं म्हणून ती 'शमिताभ' सिनेमातून रुपेरी पडद्यावर आली. पण तिचं खरं स्वप्न हे डायरेक्टर बनण्याचं आहे, हे तिने स्पष्ट केलं.

घरातून कोणतंही दडपण नाही

भविष्यात नक्कीच डायरेक्टर म्हणून सिनेमा बनवेन, असा विश्वास अक्षराने व्यक्त केला. कमल हासन आणि सारिका यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची मुलं असल्याने सिनेमात येण्याचं काही दडपण होतं का? या प्रश्नावर ती म्हणाली, "आमच्या आई-वडिलांनी आम्हाला कधीच अभिनेता किंवा अभिनेत्री होण्यासाठी जबरदस्ती केली नाही. अभिनय आवडत नसेल तर तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता, असं पूर्ण स्वातंत्र्य त्यांनी दिलं होतं. याच स्वातंत्र्यामुळे आमच्यावरचं मोठं ओझं कमी झालं."

तोंडावरच करतात परीक्षण...

आपल्या घरात सिनेमांबद्दल खूप गंभीर आणि प्रामाणिक चर्चा होते, असं अक्षराने सांगितलं. अभिनयात काही चूक झाली तर कोणतीही भीडभाड न ठेवता ते थेट तोंडावरच चुका सांगतात. बाहेरच्या लोकांच्या खोट्या स्तुतीपेक्षा घरात मिळणाऱ्या या प्रामाणिक प्रतिक्रियांमुळेच आम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करायला मदत होते, असं ती म्हणाली. सध्या अक्षरा हासनने केलेलं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Ajay Devgn: अजमेर शरीफ दर्ग्यात अजय देवगणचा पारा चढला, मुलगा युगसोबत असताना गर्दीने घेरले (WATCH)
Rajinikanth: कंडक्टर ते सुपरस्टार! रजनीकांत यांच्या आयुष्यातील 10 धडे जे तुमचं आयुष्य बदलू शकतात