
मुंबई: अहमदाबादच्या मेघाणीनगरमध्ये गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २४२ प्रवासी प्रवास करत होते आणि मोठ्या जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण देश हादरलेला असताना, या दु:खद घटनेचा प्रभाव मनोरंजन विश्वावरही जाणवतो आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखत आपला एक महत्त्वाचा कार्यक्रम तत्काळ रद्द केला आहे. तो ‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’ (ISRL) च्या भव्य लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सहभागी होणार होता. मात्र, देशात शोककळा पसरलेली असताना आनंदोत्सव साजरा करणे अयोग्य वाटल्यामुळे सलमाननं स्वतःहून हा निर्णय घेतला.
कार्यक्रमाचे आयोजक म्हणाले, "आज आपल्या देशावर एक कठीण प्रसंग ओढावला आहे. हे साजरे करण्याचं क्षण नाही. सलमान खान आणि ISRL संपूर्ण देशासोबत या दुःखद प्रसंगी एकजूट आहेत. त्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात येतो आहे." सलमान खाननं आपल्या कृतीतून संवेदनशीलता दाखवत एक सामाजिक जबाबदारीच पार पाडली आहे. त्याचा हा निर्णय चाहत्यांचंही मन जिंकतो आहे.
या विमान दुर्घटनेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अक्षय कुमार म्हणाला, “एअर इंडिया अपघाताची बातमी ऐकून मन सुन्न झालं आहे. शब्द अपुरे पडतात, केवळ प्रार्थना करता येते.”
सनी देओल यानं लिहिलं, “अहमदाबादमध्ये घडलेल्या विमान अपघाताच्या बातमीने मन व्यथित झालं आहे. माझ्या सर्व सहानुभूती आणि प्रार्थना पीडितांसोबत आहेत.”
या अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचं काम सुरू आहे. मृतांचा आकडा अधिकृतपणे समोर येणे बाकी आहे.
देश एका मोठ्या संकटातून जात असताना, बॉलिवूडच्या कलाकारांनी दाखवलेली समजूतदार भूमिका आणि सहवेदना खरंच उल्लेखनीय आहे. सलमान खानचा निर्णय हे दर्शवतो की प्रसिद्धी आणि ग्लॅमरच्या पलीकडेही एक जबाबदार नागरिक आणि संवेदनशील व्यक्ती लपलेली असते.