
मुंबई : प्रसिद्ध भजनसम्राट अनुप जलोटा यांनी अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सलमान खानने तातडीने बिश्नोई समाजाची माफी मागायला हवी, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. काळवीट शिकार प्रकरणामुळे निर्माण झालेला हा जुना वाद मिटवण्यासाठी सलमानने माफी मागणं गरजेचं असल्याचं जलोटा म्हणाले. "या घटनेमुळे मला खूप दुःख झालं आहे. हा वाद संपवण्याचा आता एकच मार्ग उरला आहे," असं ते म्हणाले.
"सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागायलाच हवी," असं जलोटा म्हणाले. समाजाच्या दुखावलेल्या भावना समजून घेण्यावर त्यांनी भर दिला. "मी हे आधीही बोललो आहे. ज्या बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांची माफी मागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसं न झाल्यास त्यांच्या भावना अशाच दुखावल्या जातील. आणि जे लोक सलमान खानसोबत काम करतात, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा फटका बसेल," अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
परिस्थिती सुधारण्यासाठी सलमानने आता ठोस निर्णय घ्यायला हवा, असं जलोटा म्हणाले. "मग बिश्नोई समाजाची माफी मागून हा विषय कायमचा संपवण्याचा धाडसी निर्णय का घेऊ नये? मला नेमकं हेच वाटतं," असं त्यांनी स्पष्ट केलं.
रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला. या घटनेनंतर तणाव वाढलेला असतानाच अनुप जलोटा यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टायगर फुटबॉल खेळून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला.
सुदैवाने या हल्ल्यातून टायगर सुखरूप बचावला. पण त्याचा ड्रायव्हर आणि तिथून जाणारा एक पादचारी या गोळीबारात जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट आणि ऑडिओ मेसेज व्हायरल झाला. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींनी या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.
या व्हायरल मेसेजमध्ये सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच सलमानशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही, अशी धमकीही देण्यात आली आहे.माहितीसाठी सांगायचं तर, सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील हा वाद १९९८ च्या राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणापासून सुरू आहे.
बिश्नोई समाज काळविटाला अत्यंत पवित्र मानतो. त्यामुळे या घटनेपासूनच बिश्नोई समाज सलमानवर संतापलेला आहे.गेल्या काही वर्षांत सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. एप्रिल २०२४ मध्ये त्याच्या वांद्रे येथील घराबाहेरही गोळीबाराची घटना घडली होती.