
मुंबई : बहुप्रतीक्षित 'रामायण' सिनेमात सीतेच्या भूमिकेत दिसण्यासाठी सई पल्लवी सज्ज झालीये. आता तिने तिच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर स्पष्टीकरण दिलंय. 'रामायण'साठी तिने शाकाहार स्वीकारल्याची चर्चा सुरू होती. पण आपण आधीपासूनच शाकाहारी असल्याचं तिने स्पष्ट केलंय. एवढंच नाही, तर परिस्थिती कशीही असली तरी आपण आपली खाण्याची सवय बदलणार नाही, असंही तिने ठामपणे सांगितलं.
'रामायण'साठी सई पल्लवी शाकाहारी झाली का?
अभिनेता रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत आणि यश एका महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या 'रामायण' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. या सिनेमात सीतेची भूमिका साकारणाऱ्या सई पल्लवीने या पात्रासाठी शाकाहार सुरू केल्याचं बोललं जात होतं.
पण यावर सई पल्लवीने दिलेलं जुनं स्पष्टीकरण आता पुन्हा चर्चेत आलंय. 'रामायण' साईन करण्यापूर्वीच आपण शाकाहारी असल्याचं तिने सांगितलं होतं. त्यामुळे सिनेमातल्या भूमिकेसाठी तिने हा निर्णय घेतलेला नाही, तर ती खूप आधीपासूनच ही जीवनशैली फॉलो करत आहे.
जपानमध्ये जेवण मिळालं नाही, तरी नियम मोडला नाही!
शाकाहाराच्या नियमाबद्दल बोलताना सई पल्लवीने जपानमधल्या शूटिंगचे दिवस आठवले. 'अमरन' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान एका टॉक शोमध्ये तिने हा अनुभव शेअर केला. जपानमध्ये जवळपास महिनाभर शूटिंग सुरू असताना शुद्ध शाकाहारी जेवण मिळणं खूप कठीण गेल्याचं तिने सांगितलं.
तिथे शाकाहारी म्हणून दिल्या जाणाऱ्या काही पदार्थांमध्ये चिकन सूप मिक्स केलेलं असायचं, ही तिच्यासाठी मोठी अडचण होती. जेवण न मिळण्याची वेळ आली तरी तिने आपला नियम मोडला नाही. एखाद्या प्राण्याला मारून खाण्यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं, अशी ठाम भूमिका सई पल्लवीने त्यावेळी घेतली होती.
सई पल्लवीची शाकाहाराबद्दलची ही निष्ठा आता पुन्हा चर्चेचा विषय ठरलीये. परदेशात गेल्यावर शाकाहारी जेवण नाही मिळालं, तरी ती आपल्या तत्त्वांशी तडजोड करत नाही, हे तिच्या या अनुभवावरून स्पष्ट होतं. 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका करत असल्यामुळे ती शाकाहारी झाली, या अफवांना तिच्या या जुन्या वक्तव्यामुळे पूर्णविराम मिळालाय.
शाकाहार हा सिनेमासाठी केलेला तात्पुरता बदल नसून, तो तिच्या वैयक्तिक विश्वासाचा आणि जीवनशैलीचा भाग असल्याचं तिने स्पष्ट केलंय. पडद्यावर सीतेची भूमिका साकारणारी सई पल्लवी खऱ्या आयुष्यातही आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत किती ठाम आहे, हे तिच्या या बोलण्यातून दिसून येतं.