
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने आता यूट्यूबवरही एन्ट्री मारली आहे. त्याने 'बीइंग द सलमान खान' (Being The Salman Khan) हे स्वतःचं यूट्यूब चॅनेल लाँच केलंय. सलमानची स्टाईल, त्याची बॉडी लँग्वेज आणि पडद्यावरची त्याची खास अदा आता फॅन्सना या चॅनेलवर जवळून पाहता येणार आहे. नुकतीच त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या चॅनेलची लिंक शेअर करत फॅन्सना तिथे येण्याचं आमंत्रण दिलं. या चॅनेलचा फॉरमॅट थोडा वेगळा आणि भन्नाट आहे. यात सलमान चक्क दोन भूमिकांमध्ये दिसणार आहे - एक म्हणजे अभिनयाचा शिक्षक आणि दुसरा म्हणजे अभिनय शिकणारा विद्यार्थी.
शुक्रवारी फॅन्ससोबत ही लिंक शेअर करताना सलमानने लिहिलंय, “सुरुवातीपासून सुरू करूया. माझं अधिकृत यूट्यूब चॅनेल. ए पासून झेडपर्यंत सगळं काही इथे मिळेल.” फॅन्ससोबत कनेक्ट राहण्यासाठी यूट्यूबचा आधार घेणारा सलमान हा काही पहिला बॉलिवूड सेलिब्रिटी नाही. याआधी आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा जोनास, कार्तिक आर्यन यांसारखे स्टार्स आणि फराह खानसारखी दिग्दर्शिकाही यूट्यूबवर स्वतःचे व्हिडिओ शेअर करत असतात.
कामाच्या बाबतीत बोलायचं तर, सलमान सध्या 'बिग बॉस २०' (Bigg Boss 20) या रिअॅलिटी शोचं होस्टिंग करत आहे. याशिवाय तो लवकरच अपूर्व लाखिया दिग्दर्शित 'मातृभूमी' (Maatrubhumi) या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात सलमान खान मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत चित्रांगदा सिंग स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.