मुंबई: ९० च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या रवीना टंडन. मात्र, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत चित्रपटात किसिंग सीन न करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. कारकिर्दीच्या सुवर्णकाळातही आणि आताही रवीना हे धोरण पाळतात.
रवीना यांची मुलगी राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. पडद्यावर किसिंग सीन करण्यास मी कधीही तयार नव्हते, पण 'नो किसिंग' हा नियम माझ्या मुलीला लागू होत नाही, असे रवीना यांनी नुकतेच सांगितले होते.
त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एका घटनेचा उल्लेख करत रवीना यांनी पडद्यावर त्यांना जे आवडत नाही ते राशाने कधीही करू नये असे सांगितले. पडद्यावर एखाद्या अभिनेत्याला किस करणे राशाला आरामदायक वाटत असेल तर त्यात काही हरकत नाही, असेही रवीना म्हणाल्या.
त्यांच्या काळात करारात लिहून दिले नसले तरी पडद्यावर कधीही सहकलाकाराला किस करणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते, असे रवीना म्हणतात. त्यांना आलेला एक अनुभवही त्यांनी सांगितला. त्यात नायकासोबत जवळीक दाखवणारा सीन होता. त्या दरम्यान नायकाचे ओठ चुकून त्यांच्या ओठांना लागले आणि त्यामुळे त्यांना खूप अस्वस्थ वाटले.
“हे चुकून घडले, शॉट झाल्यावर मी रूममध्ये धावत गेले, मला उळट्या होत होत्या. मी उलट्या केल्या. मला ते अजिबात सहन झाले नाही. मी वारंवार दात घासले, तोंड शंभर वेळा धुतले. शॉटनंतर त्या कलाकाराने माझी माफीही मागितली की त्याचा असा काही उद्देश नव्हता,” असे रवीना म्हणाल्या.
दरम्यान, रवीना लवकरच 'डायनॅस्टी' या वेब शोमध्ये दिसणार आहेत. साहिल संघ दिग्दर्शित हा एक राजकीय ड्रामा आहे, ज्यात ज्येष्ठ गायक आणि अभिनेता तलत अजीजही आहेत.