दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर आणि रोहन मापुस्कर यांनी 'एप्रिल मे ९९' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. चित्रपट १६ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, मैत्री, स्वप्नं आणि तारुण्याच्या आठवणींना उजाळा देणारा आहे.

राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंग क्षेत्रातील बादशाह म्हणून ओळखले जाणारे रोहन मापुस्कर हे दोघे भाऊ एकत्र येऊन आपल्या प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन आले आहेत. ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट जो येत्या १६ मे २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे, त्याचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

या खास प्रसंगी, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. निर्माते जोगेश भूटानी यांनी राजदत्त यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला आणि आशीर्वाद घेतले.

नुकतेच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चार तरुण सायकलींसोबत उभे असल्याचे दिसते, ज्यांच्याभोवती निळेशार आकाश आणि समुद्राचे दृश्य आहे. यावरून असे दिसते की, ‘एप्रिल मे ९९’ चित्रपट मैत्री, स्वप्नं, आणि तारुण्याच्या गोड आठवणींना उजाळा देणारा आहे. या चित्रपटाचे नाव आणि त्याची संकल्पना उन्हाळ्याच्या सुट्टीतील मस्त वेळेसोबत जोडली जाऊ शकते, ज्यात कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग असणार आहे.

चित्रपटाचे कलाकार कोण असतील, हे अद्याप गुप्त आहे. तथापि, पोस्टरचे दृष्य आणि चित्रपटाच्या टोनमुळे प्रेक्षकांना एक ताज्या आणि आकर्षक अनुभवाची आशा आहे.

राजेश मापुस्कर म्हणतात, "आमच्या कुटुंबाचा सिनेमा हॉल श्रीवर्धनमध्ये होता. तो हॉल आम्हा दोन्ही भावांसाठी चित्रपट शाळा होता. त्याच ठिकाणी आम्ही राजदत्त जींचे चित्रपट पाहून मोठे झालो आणि त्यांचे प्रत्येक पोस्टर आम्ही श्रीवर्धन आणि आसपासच्या गावांत चिकटवले. आज राजदत्त जींच्या हस्ते 'एप्रिल मे ९९' चे पोस्टर प्रदर्शित होणं, हेच आमच्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे. त्यांच्या शुभेच्छांमुळे आमच्या चित्रपट प्रवासाला बळ मिळाले आहे."

लेखक-दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांचे म्हणणे आहे, "आज मी दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर राजदत्त जींच्या हस्ते प्रदर्शित करत आहे, हे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. या चित्रपटाच्या प्रत्येक क्षणात चित्रपटांची जादू आणि कलेची आस एकत्र होत आहे. आम्हाला विश्वास आहे की प्रेक्षकांच्या प्रेमामुळे 'एप्रिल मे ९९' ला भरभरून प्रतिसाद मिळेल आणि राजदत्त सरांच्या आशीर्वादाने आमचा प्रवास यशस्वी होईल."

‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे, आणि निर्माते म्हणून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी, मॉरिस नून यांचा सहभाग आहे. तसेच, लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

चित्रपटाच्या अनावरणानंतर, प्रेक्षकांच्या मनात एक सकारात्मक उहापोह सुरू झाला आहे आणि हा चित्रपट एक नवा चित्रपटकलेचा प्रवास सुरू करणार आहे.

 

Share this article