
फरहान अख्तरचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा 'दिल चाहता है'ला या महिन्यात २५ वर्षं पूर्ण झाली. आपल्या पिढीचा एक महत्त्वाचा सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फिल्मसाठी हा एक मोठा टप्पा आहे. सिनेमाला २५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सेलिब्रेशनला अभिनेत्री प्रिती झिंटा मात्र हजेरी लावू शकली नाही. सध्या ती तिच्या 'बटवारा १९४७' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्ताने तिने या सेलिब्रेशनला मुकण्याबद्दल खुलासा केला आहे.
मीडियाशी बोलताना प्रितीने गंमतीत सांगितलं की, तिला तिच्या कमबॅक सिनेमाचं प्रमोशन आणि आमिर खानसोबत 'दिल चाहता है'चं रियुनियन यापैकी एक निवडावं लागलं. त्या प्रसंगाची आठवण सांगताना ती म्हणाली, "मला खूप साऱ्या आठवणी शेअर करायला आवडलं असतं. पण आमिरनेच आमचा बटवारा करून टाकला. मला 'बटवारा'च्या प्रमोशनसाठी यावं लागलं आणि ते लोक 'दिल चाहता है'च्या २५ वर्षांच्या सेलिब्रेशनसाठी गेले."
आमिरसोबत पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करण्यासाठी ती उत्सुक असल्याचंही प्रितीने सांगितलं. 'दिल चाहता है'चा अनुभव खूप खास होता आणि पुढचा सिनेमासुद्धा तितकाच अविस्मरणीय ठरेल, अशी आशा तिने व्यक्त केली. ती म्हणाली, "त्यामुळे, मी त्याच्यासोबत पुन्हा काम करण्यास खूप उत्सुक आहे, आशा आहे की तो चित्रपटही तितकाच संस्मरणीय ठरेल. 'दिल चाहता है' खरोखरच एक अविस्मरणीय चित्रपट होता. माझ्यासाठी 'बटवारा १९४७' हा सुद्धा एक अविस्मरणीय चित्रपट ठरणार आहे."
फरहान अख्तरने लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'दिल चाहता है'मध्ये आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना, प्रिती झिंटा, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
२००१ मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा तीन जिवलग मित्रांच्या मैत्री, प्रेम आणि ग्रॅज्युएशननंतरच्या आयुष्यातील अनिश्चिततेवर आधारित होता. या सिनेमाची फ्रेश स्टोरी, कलाकारांचा अभिनय आणि जबरदस्त म्युझिक यामुळे त्याचं खूप कौतुक झालं. या सिनेमाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. विशेषतः शहरी प्रेक्षकांमध्ये या सिनेमाने एक वेगळीच क्रेझ निर्माण केली.
मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील लोकेशन्सवर शूट झालेल्या या सिनेमाने मैत्री आणि नात्यांचं आधुनिक चित्रण केलं होतं.
प्रितीच्या करिअरसाठी हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. तब्बल आठ वर्षांनंतर ती 'बटवारा १९४७' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिचा शेवटचा सिनेमा २०१८ मध्ये आलेला 'भैय्याजी सुपरहिट' होता.