
Mumbai : सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या कलाकारांवर कधी कौतुक तर कधी टीका होत असते. त्यातील काही ट्रोलिंग इतकं मर्यादा ओलांडणारं असतं की कलाकारही हादरून जातात. अशाच एका प्रकाराला गायिका आनंदी जोशी बळी ठरली आहे. तिनं स्वतःच तिच्या एका चाहत्याची अश्लील कमेन्ट आणि ओळख सार्वजनिक करत त्याची पोलखोल केली आहे.
सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायिका आनंदी जोशी हिने इन्स्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर करत संपूर्ण प्रकार मांडला. तिने एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला, जो तिच्या गेल्या वर्षीच्या कॉन्सर्टला उपस्थित होता. तोच व्यक्ती तिच्यासोबतचा फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत तिला कौतुकाचे मेसेज पाठवत असे. मात्र, काही दिवसांपूर्वी तिला त्या व्यक्तीकडून अश्लील कमेन्ट आली.
त्या व्यक्तीने आनंदीच्या फोटोखाली कमेन्ट केली होती – “क्लिवेज बघ किती डीप आहे.” हा मेसेज पाहून आनंदीला धक्का बसला. तिनं लगेच त्याला विचारलं की हा मेसेज चुकून तिला पाठवला आहे का? त्यावर त्या व्यक्तीनं मेसेज डिलीट केला. आनंदीने सांगितलं की, कदाचित तो मेसेज त्याच्या मित्राला पाठवायचा होता, पण चुकून तिला गेला.
तिनं पुढे एका स्टोरीत लिहिलं की, “एका अर्थानं बरं झालं हा प्रकार घडला, त्यामुळे लोकांचं खरे इंटेन्शन समजले. पण मला धक्का बसला कारण तो व्यक्ती Pediatrician आहे. म्हणजेच मुलांच्या उपचाराशी संबंधित डॉक्टर. लोक आपल्या मुलांना ज्यांच्याकडे सोपवतात, तोच अशा विचारांचा आहे हे भयावह आहे.”
आनंदी म्हणाली, “हा मुद्दा फक्त त्या मेसेजबद्दल नाही, तर त्या व्यक्तीच्या मानसिकतेबद्दल आहे. एक डॉक्टर जो मुलांशी थेट संपर्कात असतो, तोच महिलांविषयी अशा कमेन्ट करतो, ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. पालकांनी सावध राहावं आणि आपल्या मुलांबद्दल अधिक जागरूक रहावं.”
आनंदी जोशीच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी तिचं समर्थन केलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर महिलांवर होणाऱ्या अश्लील कमेंट्सचा** आणि व्यावसायिक जबाबदारी विसरणाऱ्या लोकांच्या वृत्तीचा मुद्दा समोर आला आहे.