
सध्या सर्वत्र अथर्व सुदामेची चर्चा सुरु झाली आहे. त्याला अनेकवेळा मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काही जणांनी त्याच्या समर्थनार्थ पोस्ट टाकायला सुरुवात केली आहे. अथर्व सुदामेला वकील असीम सरोदे यांनी परत एकदा व्हिडीओ अपलोड कर कोण काय करतंय आपण बघूया असं म्हटलं आहे.
असीम सरोदे म्हणतात की, "अथर्व सुदामे याने घाबरून व्हिडीओ डिलीट केला हे योग्य केले नाही असे वाटले. अथर्वबाबत अनेक लोक विविध मतं मांडतात. त्याच्या व्हिडीओतील विनोदाच्या दर्जाबाबत बोलले जाते. परंतु त्यानं जे रिल्स सातत्यानं तयार केलेत, स्पर्धेच्या युगात स्वतःचा एक मार्ग तयार केला, त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. त्याचे काही विनोद अनेकांना उथळ,पांचट, निरर्थक वाटले असतील पण ते अश्लील नव्हते..."
"कधी उथळ, गंभीर, गमतीदार, विचार प्रवर्तक तर कधी सुमारही अशा वळणांवरून एखादा विषय नेमकेपणाने हाताळला जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता, बंधुभाव, प्रेम जपण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ डिलीट करणे मला चिंताजनक वाटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत. तेवढयासाठी मी अथर्व सोबत आहे.
"राज ठाकरे साहेबांनी अथर्वचं जाहीर कौतुक केलं होतं, तेव्हा पासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असे सुद्धा दिसते. एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळाले. पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असतांना राज ठाकरेंनी व मनसेने अथर्वच्या सोबत उभे राहावे असे आताच माझे राज साहेबांसोबत बोलणे झाले. अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूया." असं पुढं बोलताना सरोदे यांनी म्हटलं आहे.