छाया कदम अडचणीत, वन्यप्राण्यांचे मांस खाल्ल्याच्या वक्तव्याची होणार चौकशी

Published : May 01, 2025, 06:52 PM ISTUpdated : May 01, 2025, 06:54 PM IST
छाया कदम

सार

‘लापता लेडीज’, ‘सैराट’ आणि ‘ऑल वुई इमॅजिन ॲज अ लाइट’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री छाया कदम चांगल्याच वादात अडकल्या आहेत.

मुंबई – ‘लापता लेडीज’, ‘सैराट’ आणि ‘ऑल वुई इमॅजिन ॲज अ लाइट’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री छाया कदम चांगल्याच वादात अडकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी ससा, रानडुक्कर आणि घोरपडीचं मांस खाल्ल्याचं खुलेपणानं कबूल केलं होतं. हेच वक्तव्य आता त्यांच्या अंगलट आलं आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार हे प्राणी संरक्षित असून त्यांची शिकार करणं व मांस खाणं हा कायद्याप्रमाणे गुन्हा आहे.

या वक्तव्यानंतर प्लांट अँड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी (PAWS) या स्वयंसेवी संस्थेनं ठाण्याच्या वनसंरक्षक व विभागीय वन अधिकारी यांच्याकडे छाया कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावर महाराष्ट्र वन विभागाने चौकशी सुरू केली असून विशेष पथक नेमण्यात आलं आहे. हे पथक केवळ छाया कदम यांच्यावरच नव्हे तर अशा मांसाचा पुरवठा करणाऱ्या शिकाऱ्यांचाही शोध घेणार आहे.

वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत ससा, रानडुक्कर, घोरपड आणि हरीण हे प्राणी संरक्षित यादीत समाविष्ट आहेत. त्यांची शिकार व मांस सेवन हे गंभीर गुन्हे मानले जातात, आणि दोषी आढळल्यास शिक्षा होऊ शकते.

तपास अधिकारी राकेश भोईर यांनी माहिती दिली, “आम्ही छाया कदम यांच्याशी संपर्क साधला असून त्या सध्या कामानिमित्त बाहेरगावी आहेत. त्या चार दिवसांनंतर परत येणार असून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर चौकशीसाठी उपस्थित राहतील, असं त्यांनी कळवलं आहे.”

या प्रकरणाची चौकशी अधिकृतरीत्या सुरू झाली असून पुढील काही दिवसांत छाया कदम यांचं काय उत्तर येतं, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

PREV

Recommended Stories

Dhurandhar Banned : 300 कोटी कमावणारा धुरंधर पाकिस्तानमध्ये नव्हे तर या 6 देशांमध्ये का झाला बॅन?
Rajinikanth 75 Birthday : मराठमोळ्या स्टाईल अन् अ‍ॅक्शनची रुपेरी पडद्यावर 50 वर्षे पूर्ण, चाहत्यांनी तयार केला #HBDSuperstarRajinikanth हॅशटॅग!