
मुंबई : राजीव मसंद यांनी नुकतीच 'सायरस सेज' (Cyrus Says) पॉडकास्टवर कंगना रणौतबद्दल चर्चा केली. गेल्या काही वर्षांत कंगनामध्ये झालेल्या बदलांवर त्यांनी भाष्य केलं. तिच्या जुन्या कामाची आठवण काढताना मसंद म्हणाले की, त्यांना "अभिनेत्री कंगना"ची खूप आठवण येते. यावेळी त्यांनी कंगनाच्या सध्याच्या इमेजवरही जोरदार टोला लगावला.
बॉलिवूडमधल्या बड्या लोकांनी आपल्याला काम मिळू दिलं नाही, असा आरोप कंगना नेहमी करते. मसंद यांनी तिच्या या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांच्या मते, सुरुवातीला कलाकारांना कितीही अडचणी आल्या, तरी ही इंडस्ट्री शेवटी फक्त यशालाच सलाम करते.
कंगनावर टीका केली असली, तरी राजीव मसंद यांनी तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुकही केलं. २०१४ मध्ये आलेल्या 'क्वीन' सिनेमातल्या तिच्या कामाची त्यांनी खास आठवण काढली. तिचं ते काम "अमेझिंग" होतं, असं ते म्हणाले. दिग्दर्शक विकास बहलसोबत ती 'क्वीन २' मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हे पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मसंद पुढे म्हणाले की, जेव्हा कंगना कथा आणि विषयांवरून सिनेमे निवडायची, तेव्हा ती जास्त प्रभावी वाटायची. त्यांनी त्या काळाची आठवण काढली, जेव्हा प्रेक्षकांना पडद्यावर अभिनेत्री कंगना नाही, तर तिची व्यक्तिरेखा दिसायची. त्यांनी कंगनाला एक उत्तम अभिनेत्री म्हटलं आणि तिच्या अभिनयाची तुलना आलिया भट्टशी केली. आलियालाही ते हिंदी सिनेमातल्या सर्वात ताकदवान अभिनेत्रींपैकी एक मानतात.
कंगना आणि मसंद यांच्यात याआधीही अनेकदा जाहीर वाद झालेत. २०२१ मध्ये जेव्हा मसंद धर्मा प्रोडक्शनच्या टॅलेंट एजन्सीमध्ये गेले, तेव्हा कंगनाने त्यांच्या पत्रकारितेवर सडकून टीका केली होती. मसंद यांनी तिच्याबद्दल आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबद्दल "विषारी" ब्लाइंड आयटम्स (नावाचा उल्लेख न करता छापलेल्या बातम्या) लिहिल्याचा आरोप तिने केला होता.
त्यानंतर २०२४ च्या एका मुलाखतीत मसंद यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी ब्लाइंड आयटम्स लिहिण्याचं समर्थन केलं आणि त्यांच्या बातम्यांवरून झालेल्या टीकेवरही भाष्य केलं. आताच्या ताज्या पॉडकास्टमध्ये, नेहमी आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या सेलिब्रिटींबद्दल बोलताना त्यांनी राखी सावंत आणि सुनीता आहुजा यांसारख्या नावांचाही उल्लेख केला.