
मुंबई : गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात सध्या वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता अभिनेत्री दिव्या खोसला हिने सुनीता आहुजा यांना पाठिंबा दिला आहे. दिव्याने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहीत गोविंदावर निशाणा साधला आहे. गोविंदा सध्या त्याची को-स्टार कोमल स्वर्णकार हिच्यासोबत सगळीकडे फिरताना दिसतोय, यावर दिव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आयुष्यभर नवऱ्याची साथ देणाऱ्या सुनीता यांना अधिक आदर मिळायला हवा, असं दिव्याने म्हटलंय. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर महिलांचे स्वातंत्र्य, लग्न आणि नात्यांचा आदर यावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.
९० च्या दशकात गोविंदा किती लोकप्रिय होता, याबद्दल बोलताना दिव्या म्हणाली की, तो तिच्या आईसह अनेकांचा आवडता अभिनेता होता. पण, त्याच्या सध्याच्या वागण्यामुळे तिच्या मनातली त्याची प्रतिमा बदलली आहे. तिने लिहिलंय, "गोविंदा जी, तुम्ही खूप सीनिअर आणि आदरणीय अभिनेते आहात. ९० च्या दशकात लहानाचे मोठे होताना तुमचे सिनेमे पाहणं आमच्यासाठी खूप मनोरंजक होतं. खरं तर, गोविंदा जी, तुम्ही माझ्या आईचे आणि इतर अनेक लोकांचे आवडते अभिनेते होतात."
"सुनीता जी यांनी एक महिला म्हणून तुम्हाला त्यांचं सर्वस्व दिलं. त्या कायम प्रामाणिक राहिल्या. त्यांनी तुमच्या मुलांचा सांभाळ केला. स्वतःचं करिअर कधीच बनवलं नाही. एक महिला यापेक्षा जास्त काय करू शकते? तुमच्या यशामागे त्याच होत्या. तुम्ही बाहेर यशस्वी झालात, पण त्याचं सगळं श्रेय फक्त तुम्हाला जात नाही. मला वाटतं, तुम्हाला कधीच घरातल्या मुलांची जबाबदारी उचलावी लागली नाही," असंही दिव्याने पुढे म्हटलंय.
कोमलसोबतच्या गोविंदाच्या फिरण्यावर प्रश्न उपस्थित करत दिव्या म्हणाली की, हे सगळं पाहणं खूप कठीण जातंय. विशेषतः जेव्हा त्यांच्या कथित नात्याबद्दल सार्वजनिक चर्चा होत आहेत. "आता एक महिला आपल्यासमोर, संपूर्ण समाजासमोर मदतीची याचना करत उभी आहे आणि आपण सगळे गप्प आहोत. कोणालाही वैयक्तिक बाबींमध्ये पडायचं नाहीये, पण मग प्रेक्षक म्हणून आम्हाला हे सगळं का दाखवलं जातंय?" असा सवाल तिने केला.
दिव्याने सुनीता यांच्या भावनांबद्दलही भाष्य केलं. आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना साथ आणि काळजी मिळायला हवी, असं ती म्हणाली. "होय, सुनीता जी कदाचित कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या नसतील, पण त्या जे बोलतात ते माझ्यापर्यंत पोहोचतं. त्यांचं मन, त्यांच्या वेदना मला समजतात. वयाच्या ५८ व्या वर्षी, जेव्हा महिला आजी होण्याच्या वयात असतात, तेव्हा त्यांना फक्त नवऱ्याची साथ हवी असते. जर या वयातही एका पत्नीला तिच्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर या माणसासाठी इतकी वर्षं, संपूर्ण आयुष्य पणाला लावण्यात काय अर्थ होता? सुनीता जी, मला तुमच्याबद्दल खूप वाईट वाटतंय आणि मला माफ करा," असं दिव्याने लिहिलं.
दिव्याने थेट गोविंदाला उद्देशून आपली पोस्ट संपवली. त्याच्या वागण्यामुळे तिच्या मनात असलेला आदर कमी झाल्याचं ती म्हणाली. "आणि गोविंदा जी यांना माझी विनंती आहे: सर, तुम्ही एक लेजेंड आहात, पण तुमचा आदर तुमच्याच हातात आहे. तुम्ही पुढच्या पिढीसमोर एक अत्यंत वाईट उदाहरण ठेवत आहात आणि माझ्या नजरेत तुम्ही तुमचा आदर गमावला आहे."
गोविंदा नुकताच त्याची आगामी फिल्म 'रूपा' मधील को-स्टार कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला होता. त्यानंतरच दिव्याची ही पोस्ट आली आहे. त्यांच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल आणखी चर्चा सुरू झाल्या. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचं १९८७ मध्ये लग्न झालं असून त्यांना दोन मुलं आहेत.