
नॅचरल स्टार नानीचा 'द पॅराडाईस' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. 'दसरा' फेम दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. यात कयादू लोहार मुख्य भूमिकेत आहे. पण तुम्हाला माहितीये का? या भूमिकेसाठी कयादू ही पहिली पसंती नव्हती. एका बड्या स्टार अभिनेत्रीने या सिनेमाला नकार दिला आणि कयादूला ही मोठी संधी मिळाली.
बॉक्स ऑफिसवर 'द पॅराडाईस'चा जलवा
'द पॅराडाईस'ला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण बॉक्स ऑफिसवर मात्र सिनेमाने तगडी कमाई केलीये. निर्मात्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांतच सिनेमाने तब्बल ११४ कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय.
'दसरा' फेम श्रीकांत ओडेला यांनी दिग्दर्शित केलेल्या या ॲक्शन एंटरटेनरमध्ये नानीने 'जडल' ही व्यक्तिरेखा साकारलीये, तर कयादू लोहार 'सुब्बू'च्या भूमिकेत आहे. त्यांच्यासोबत मोहन बाबू, राघव जुयाल, संपूर्णेश बाबू आणि सोनाली कुलकर्णी यांसारख्या तगड्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
कयादू लोहार नव्हती पहिली पसंती!
सिनेमाच्या यशाची चर्चा सुरू असतानाच आता एक रंजक माहिती समोर आलीये. दिग्दर्शक श्रीकांत ओडेला आणि निर्मात्यांची 'सुब्बू' या पात्रासाठी कयादू लोहार ही पहिली पसंती नव्हती. त्यांनी एका दुसऱ्या स्टार अभिनेत्रीला या भूमिकेची ऑफर दिली होती. पण तिने नकार दिल्यानंतर कयादूची वर्णी लागली.
कोण आहे ती स्टार अभिनेत्री?
आता नानीसोबत काम करण्याची संधी सोडणारी ती अभिनेत्री कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. तर ती दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर आहे. ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा' सिनेमातून जान्हवीने तेलुगू सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली. त्यानंतर ती राम चरणच्या 'पेद्दी' सिनेमातही काम करत आहे. याच काळात 'द पॅराडाईस'च्या टीमने जान्हवीशी संपर्क साधला होता.
या एका कारणामुळे दिला नकार!
पण त्यावेळी जान्हवी कपूर 'पेद्दी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये खूप बिझी होती. तारखांचा मेळ बसत नसल्याने तिला 'द पॅराडाईस'ची ऑफर स्वीकारता आली नाही. तिने माघार घेतल्यावर निर्मात्यांनी 'सुब्बू'च्या भूमिकेसाठी कयादू लोहारची निवड केली.
विशेष म्हणजे, सिनेमात कयादूच्या वाट्याला फारसं स्क्रीन टाईम किंवा महत्त्व आलेलं नाही, अशीही चर्चा आहे. त्यामुळे जर जान्हवीने ही भूमिका केली असती, तर तिचं पात्र कसं असतं आणि प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली असती, यावर आता सोशल मीडियावर चर्चा रंगलीये.
'द पॅराडाईस'ची निर्मिती सुधाकर चेरुकुरी यांनी श्री लक्ष्मी व्यंकटेश्वर सिनेमाज (SLV Cinemas) या बॅनरखाली केलीये. अनिरुद्ध रविचंदरने या सिनेमाला संगीत दिलंय. हा सिनेमा फक्त तेलुगूच नाही, तर तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये रिलीज झालाय. सर्वच ठिकाणांहून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. नानी आणि श्रीकांत ओडेला यांच्या या जोडीने सध्या बॉक्स ऑफिसवर आपली पकड घट्ट केलीये.