
मुंबई : रक्षाबंधनाच्या अगदी आधी बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हुमा कुरेशीच्या चुलत भावाची दिल्लीत हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री दिल्ली झोपायला जात असताना निजामुद्दीनचा परिसर हत्येने हादरला. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. हुमा कुरेशीची हत्या झालेल्या चुलत भावाचे नाव आसिफ कुरेशी आहे. सदर घटना निजामुद्दीन भोगल जंगपुरा येथील आहे. आसिफ कुरेशीच्या हत्येमुळे कुरेशी कुटुंबात शोककळा पसरली आहे.अशातच आता हुमा कुरेशीच्या वडिलांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात असा प्रश्न आहे की हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या का करण्यात आली? मध्यरात्री निजामुद्दीन परिसरात भांडण कशावरून झाले?
खरंतर, निजामुद्दीन पोलिस स्टेशन परिसरातील जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. पार्किंगच्या वादातून हुमा कुरेशीचा भाऊ आसिफ कुरेशीची हत्या झाल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजताच्या सुमारास, गेटवरून स्कूटी काढून बाजूला पार्क करण्यावरून झालेल्या वादात आरोपीने आसिफ कुरेशीवर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आसिफला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृताची पत्नी आणि नातेवाईकांचे म्हणणे आहे की आरोपीने किरकोळ कारणावरून क्रूरपणे हा गुन्हा केला. आसिफ कुरेशीच्या पत्नीने म्हटले की, यापूर्वीही पार्किंगच्या वादावरून आरोपीचे माझ्या पतीशी भांडण झाले होते. गुरुवारी रात्री माझे पती कामावरून घरी परतले तेव्हा शेजारच्याची स्कूटी घरासमोर पार्क केलेली होती. त्याने शेजाऱ्याला ती काढण्यास सांगितले. पण स्कूटी काढण्याऐवजी शेजाऱ्याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रकरण इतके बिघडले की कोणीतरी त्याला धारदार वस्तूने मारले.
हुमा कुरेशीच्या वडिलांनी काय म्हटले?
दुसरीकडे, हुमा कुरेशीचे वडील सलीम कुरेशी म्हणाले की, मी घरी झोपलो होतो. मला फोन आला की आसिफची हत्या झाली आहे. आसिफने स्कूटर काढण्यास सांगितले होते. यावरवरुन भांडण झाले. यानंतर आसिफवर दोन जणांनी हल्ला केला आहे. सलीम कुरेशी यांनी सांगितले की, आसिफ ४२ वर्षांचा होता आणि तो रेस्टॉरंटमध्ये चिकन पुरवण्याचे काम करायचा. आसिफच्या दोन पत्नी आहेत. त्यांनी सांगितले की, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. सध्या आसिफच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. त्यानंतर त्याला मारण्यासाठी काय वापरले गेले हे स्पष्ट होईल.
पोलिसांनी काय कारवाई केली?
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि हत्येत सहभागी असलेल्या दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी भाऊ असून नावे गौतम आणि उज्ज्वल असे आहे. हा वाद फक्त पार्किंगवरून झाला होता की त्यांच्यात जुने वैमनस्य होते हे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील जप्त केले आहे. सध्या परिसरात पोलिस तैनात आहेत. या हत्येबाबत हुमा कुरेशीने अद्याप कोणतेही निवेदन दिलेले नाही. हुमा कुरेशी आणि तिचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी यांचे घर जवळच आहे.