
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या अधिकच पसंतीस उतरते आहे. मालिकेच्या लाँचच्या पहिल्याच आठवड्यात 6.7 टीआरपी मिळवत धमाकेदार एन्ट्री घेतलेल्या या कथानकात आता एक नवा आणि थरारक वळण येणार आहे. आणि यासाठी अभिनेत्री गिरीजा प्रभूने आपल्या भूमिकेसाठी चक्क चिखलात उतरून, तीन तास दलदलीत राहून एक सीन साकारला आहे. हा विशेष सीन रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.
कथेप्रमाणे, उदय आणि कावेरी यांच्या अपघातानंतर कावेरी लहानग्या चिकूला घेऊन धर्माधिकारींच्या घरी येते. मात्र घराची सून म्हणून तिचा स्वीकार होत नाही. सुलक्षणा तिच्यासमोर एक अवघड अट ठेवते. मंदिराजवळ असलेल्या धोकादायक तलावातून कमळ आणावं लागेल. हा तलाव म्हणजे मृत्यूचा दरवाजा, असं गावकऱ्यांचं मत. पाण्यात दलदल, गाळ आणि विषारी जीव, यामुळे तिथं उतरायचं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं. पण कावेरी, म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू, हे आव्हान स्वीकारते आणि निर्भीडपणे तलावात उतरते.
या सीनबद्दल बोलताना गिरीजा म्हणाली, “साडी नेसून दलदलीत उतरणं हे खरोखरच तारेवरची कसरत होती. तीन तास चिखलात राहून हा सीन साकारला. बॉडी डबल न वापरता मी स्वतः हा प्रसंग शूट केला. टीमच्या एकदिलाने केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे.” कुडाळ येथील वालावल मंदिराजवळील तलावात हा प्रसंग चित्रित करण्यात आला. तलावातील दलदल, कमळांचं जाळं, सतत बुडत जाणारे पाय... यामुळे हा सीन अत्यंत जोखमीचा होता. पण गिरीजाने अफाट जिद्दीनं आणि समर्पणाने तो पूर्ण केला.
कावेरी तलावातून सुरक्षित बाहेर येणार का? तिचं धर्माधिकारी कुटुंबात स्थान मिळणार का? हे सगळं पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. थरार, नाट्य आणि भावनिक गाठींचा मिलाफ असलेल्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेचा हा एपिसोड नक्की चुकवू नका!