Shubham Karoti : नाटकातलं घर नाही… घराघरातलं नाटक; रंगभूमीवर ‘शुभं करोति’ नाटकातून उलगडणार आजच्या कुटुंबाची गोष्ट

Published : Sep 28, 2026, 07:15 PM IST
shubham karoti natak

सार

Shubham Karoti Marathi Play : शुभं करोती हे नवं नाटक १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकात घराघरातील गोष्ट असून अभिनय बेर्डे, सीमा देशमुख, हृषिकेष जोशी, अपूर्वा गोरे भूमिका साकारणार आहेत.

मुंबई : घर म्हटलं की प्रेम, अपेक्षा, स्वप्नं, मतभेद आणि एकमेकांची काळजी हे सगळं आलंच. मुलांची स्वप्नं आणि पालकांच्या अपेक्षा यांच्यातली तारेवरची कसरत अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. याच घराघरात घडणाऱ्या गोष्टींना रंगमंचावर घेऊन येत आहे ‘शुभं करोति’ हे नवं मराठी नाटक. ‘नाटकातलं घर नाही… घराघरातलं नाटक…’ अशी उत्सुकता वाढवणारी ओळख घेऊन येणारं हे नाटक १ ऑक्टोबरपासून रंगभूमीवर दाखल होत आहे.

ब्ल्यू रॅम्प एन्टरटेन्मेंट, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि सरगम क्रिएशन्स निर्मित, रावेतकर प्रस्तुत या नाटकाचं लेखन वैभव जोशी यांनी केलं असून दिग्दर्शन भाग्येश रानडे यांचं आहे. श्रीरंग खापर्डे, सिद्धार्थ गोखले, नितीन प्रकाश वैद्य आणि राहुल शरद अवस्थी हे नाटकाचे निर्माते आहेत.

‘शुभं करोति’ची कथा एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाभोवती फिरणारी आहे. स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल वेगळी स्वप्नं पाहाणाऱ्या तरुण मुलाचा प्रवास, त्याच्या निर्णयांकडे पालक पाहातात त्या नजरेतून निर्माण होणारे प्रश्न आणि अपयशाच्या टप्प्यावर कुटुंबाची मिळणारी साथ, या सगळ्याची भावनिक गुंफण या नाटकात पाहायला मिळणार आहे. आजच्या पिढीच्या विचारांपासून पालकांच्या मनातील काळजीपर्यंत अनेक परिचित पैलू या कथेतून समोर येणार आहेत.

‘शुभं करोति’ हे नाटक रंगमंचावर कौटुंबिक नात्यांची गोष्ट सांगतानाच अपयशाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन, स्वतःला समजून घेणं आणि आयुष्यात योग्य मार्ग शोधण्याचा प्रवासही मांडतं. रोजच्या जगण्यात सहजपणे आपल्या कानावर पडणारे मराठी श्लोक आणि संतसाहित्य यातील विचार आधुनिक जीवनाच्या प्रश्नांशी जोडत नाटक पुढे सरकतं. त्यामुळे परंपरा आणि आजची पिढी यांचा एक सुंदर संवादही या नाटकातून घडताना दिसणार आहे.

दिग्दर्शक भाग्येश रानडे म्हणतात, ‘’ ‘शुभं करोति’ ही एका घराची गोष्ट आहे आणि त्याच वेळी ती अनेक घरांची गोष्टही आहे. आज मुलांच्या स्वप्नांचा आणि पालकांच्या अपेक्षांचा मेळ घालताना अनेक कुटुंबांमध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. अपयश आलं की आपण स्वतःकडे आणि आपल्या माणसांकडे कसं पाहातो, हा या नाटकाचा महत्त्वाचा भाग आहे. श्लोक आणि संतसाहित्यातले विचार आम्ही कोणताही उपदेश न करता कथेत सहजपणे गुंफले आहेत. प्रेक्षकांनी हे नाटक पाहाताना ‘ही तर आपल्या घरातलीच गोष्ट आहे’ असं कुठेतरी मनापासून जाणवावं, अशी आमची इच्छा आहे.’’

लेखक वैभव जोशी म्हणतात, ‘’ ‘शुभं करोति’ लिहिताना मला आजच्या कुटुंबांमध्ये बदलत जाणारी नाती आणि त्या नात्यांमागच्या भावना मांडायच्या होत्या. मुलांना स्वतःचं आयुष्य घडवायचं असतं तर पालकांना त्यांच्या भविष्याची काळजी असते. या दोन बाजूंमधला संवाद, त्यातून निर्माण होणारे प्रसंग आणि शेवटी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न हा या नाटकाचा गाभा आहे. आजच्या काळातही आपल्या संस्कारांमधले विचार आपल्याला कसे जोडून ठेवतात, हे कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’’

या नाटकात अभिनय बेर्डे, अपूर्वा गोरे, सीमा देशमुख आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १ ऑक्टोबरपासून घराघरात घडणारी ही गोष्ट रंगमंचावर दाखल होत आहे. आपल्या कुटुंबातील नात्यांची, स्वप्नांची आणि अपेक्षांची काहीशी ओळखीची झलक दाखवणारं ‘शुभं करोति’ प्रेक्षकांना हसवेल, भावेल आणि आपल्या घराकडे नव्या नजरेने पाहायलाही भाग पाडेल.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Hrithik Roshan: आनंद सरांच्या 'सुपर इन्फिनिटी'चं हृतिक रोशनकडून कौतुक
Amitabh Bachchan: टायगर श्रॉफनंतर आता अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा'ला बॉम्बने उडवण्याची धमकी