
वयाच्या १५ व्या वर्षी स्टारडम: लग्नानंतर सोडलं काम, मग पुन्हा कमबॅक!
काही कलाकारांचा सिनेसृष्टीतला प्रवास एखाद्या सिनेमाच्या स्टोरीसारखाच असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी हिरोईन म्हणून एंट्री मारली आणि पहिल्याच सिनेमाने देशभरात धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे, त्यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार रविचंद्रन यांच्यासोबत 'युगपुरुष' या कन्नड सिनेमातही काम केलंय.
१९७३ मध्ये राज कपूर दिग्दर्शित 'बॉबी' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातून डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) आणि ऋषी कपूर ही नव्या पिढीची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली. तुम्हाला ऐकून नवल वाटेल, पण डिंपल यांनी जेव्हा स्क्रीन टेस्ट दिली, तेव्हा त्या फक्त १४ वर्षांच्या होत्या. त्यांचं सौंदर्य, नॅचरल अॅक्टिंग आणि व्यक्तिमत्त्व बघून राज कपूर खूप इम्प्रेस झाले आणि फायनली 'बॉबी'ची हिरोईन म्हणून त्यांची निवड झाली.
'बॉबी' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि डिंपल रातोरात स्टार झाल्या. पहिल्याच सिनेमातून त्यांनी लाखो फॅन्स कमावले आणि त्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये जाऊन बसल्या.
करिअर एकदम पीकवर असताना डिंपल यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट आला. त्यांनी बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आणि त्यानंतर काही वर्ष त्या सिनेसृष्टीपासून पूर्णपणे दूर राहिल्या. या दोघांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या.
लग्नानंतर डिंपल यांनी आपलं कुटुंब आणि मुलांच्या जबाबदारीला प्राधान्य दिलं. त्यामुळे त्या सिनेमांपासून लांबच राहिल्या. याच काळात राजेश खन्ना यांच्या करिअरमध्येही बरेच चढ-उतार आले. हळूहळू त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही दुरावा निर्माण झाला आणि दोघेही वेगळे राहू लागले.
यानंतर डिंपल यांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतण्याचा निर्णय घेतला. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी 'सागर' सिनेमातून हिरोईन म्हणून दमदार कमबॅक केलं. आणखी एक खास गोष्ट म्हणजे, या सिनेमात त्यांच्यासोबत त्यांचा पहिला हिरो ऋषी कपूरच होता.
बालकलाकार म्हणून नाही, तर वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी थेट हिरोईन म्हणून आलेली डिंपल कपाडिया यांची ही जर्नी खरोखरच वेगळी आहे. त्यांचं स्टारडम, वैयक्तिक निर्णय आणि कमबॅकची ही कहाणी आजही लोकांना प्रेरणा देते.
होय, हे खरंय. बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीला लहानपणी कुष्ठरोगाचा (Leprosy) सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्वतः हा खुलासा केलाय. त्या १२ वर्षांच्या असताना त्यांच्या कोपऱ्यावर कुष्ठरोगाची लक्षणं दिसू लागली होती. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाच्या जवळच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने या आजारामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती. डिंपल सांगतात की, त्या वयात त्यांना त्या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता किंवा त्यामागे असलेल्या सामाजिक कलंकाची (Stigma) कोणतीही समज नव्हती.
पण, हाच आजार त्यांच्या सिनेसृष्टीतल्या एंट्रीचं कारण ठरला, हेही तितकंच खरंय. डिंपल यांचे वडील चुन्नीभाई कपाडिया यांचे सिनेसृष्टीतल्या मोठ्या लोकांशी चांगले संबंध होते. "एक अत्यंत सुंदर मुलगी कुष्ठरोगाने ग्रस्त आहे" हे जेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांना समजलं, तेव्हा त्यांनी डिंपल यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. या भेटीनंतरच राज कपूर यांनी डिंपल कपाडिया यांना त्यांच्या 'बॉबी' (१९७३) या ऐतिहासिक सुपरहिट सिनेमातून बॉलिवूडमध्ये लाँच केलं. त्याच वेळी योग्य उपचार घेतल्यामुळे त्या या आजारातून पूर्णपणे बऱ्याही झाल्या.