बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वयाच्या ८२व्या वर्षीही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. बिग बी आजही सर्वांच्या मनात खास स्थान राखून आहेत. नुकताच त्यांनी आपल्या ब्लॉगमधून वय वाढल्यानंतर येणाऱ्या शारीरिक बदलांबाबत मनमोकळं लिहिलं.
अमिताभ बच्चन म्हणाले की, "पूर्वी सहज वाटणारी लहान-सहान दैनंदिन कामं आता कठीण झाली आहेत. साधी पॅन्ट घालायची असेल तरी ती उभं राहून घालणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे डॉक्टरांनी बसूनच कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. सुरुवातीला हे ऐकून हसू आलं, पण आता त्याची खरी गरज कळते."
ते पुढे म्हणाले की, "आता घरात आधारासाठी हँडल बार्सची गरज भासते. टेबलावरून पडलेला एक साधा कागद उचलतानाही सहजपणे वाकता येत नाही. वय जसजसं वाढतं, तसतशी शरीराची ताकद आणि लवचिकता कमी होत जाते. पूर्वीच्या सवयी ज्या अगदी सोप्या वाटत होत्या, त्या पुन्हा सुरू करणं कठीण झालं आहे."
26
वेदना आणि शरीरावर परिणाम लगेच जाणवतो
बिग बी यांनी आपल्या दिनचर्येबद्दल सांगितलं की, "आता दिवस औषधं, व्यायाम आणि महत्त्वाच्या कामांनुसार नियोजित होतो. प्राणायाम, हलका योगा आणि जिममधील व्यायाम या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत. एका दिवसाची तफावत झाली तरी वेदना आणि शरीरावर परिणाम लगेच जाणवतो."
वाढत्या वयातील सत्य स्वीकारताना अमिताभ बच्चन म्हणाले की, "ही अवस्था कुणालाही अनुभवायला लागू नये अशी माझी इच्छा आहे. पण खरं सांगायचं, तर ही वेळ प्रत्येकावर येतेच. माणूस जन्माला येतो तेव्हापासूनच उतारवयाची वाट सुरू होते. हे कटू सत्य आहे, पण त्याचा स्वीकार करणं भाग आहे."
36
जीवनाला जणू काही स्पीडब्रेकर लागलाय
ते पुढे म्हणाले की, "तरुणपणात आपण प्रत्येक आव्हान आत्मविश्वासाने पेलतो. पण वय वाढल्यावर जीवनाला जणू काही स्पीडब्रेकर लागतो. शेवटी ही अशी झुंज आहे ज्यात कोणीच जिंकू शकत नाही. ही एक हार आहे, जी स्वीकारणं योग्य ठरतं. जीवनाचा उद्देश पूर्ण झाला की बाजूला व्हायचं असतं. हे ऐकायला जरी गंभीर वाटलं, तरी हेच सत्य आहे."
अमिताभ बच्चन यांचा हा प्रामाणिक खुलासा त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आणि त्यांचा आत्मविश्वास व उत्साह पाहून कौतुकही केलं.
वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, बिग बी सध्या कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या सिझनमध्ये व्यस्त आहेत. याशिवाय, प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कल्की २८९९ एडी या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे.
56
उत्साह, जिद्द आणि सकारात्मकता टिकवणं हेच खरं यश
८२ वर्षांच्या वयातही बिग बींमध्ये काम करण्याची ऊर्जा आणि आयुष्याकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी कायम आहे. त्यांनी स्वतःचा अनुभव मोकळेपणाने शेअर करून वयाच्या एका टप्प्यावर प्रत्येकाला सामोरे जावं लागणारं वास्तव अधोरेखित केलं आहे. त्यांच्या या शब्दांतून आयुष्याची एक मोठी शिकवण मिळते, वय जरी वाढलं तरी उत्साह, जिद्द आणि सकारात्मकता टिकवणं हेच खरं यश आहे.