
Bollywood Legend Dharmendra Discharged From Hospital : अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. धर्मेंद्र यांची प्रकृती पूर्णपणे ठीक असल्याचे कुटुंबाने स्पष्ट केले आहे. पुढील उपचार घरीच सुरू राहतील. कुटुंबीयांच्या निर्णयानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास धर्मेंद्र यांनी रुग्णालय सोडले. त्यांना रुग्णवाहिकेतून घरी नेण्यात आले. यावेळी अभिनेता बॉबी देओल त्यांच्यासोबत होता. सुमारे १२ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
काल मंगळवारी सकाळच्या सुमारास धर्मेंद्र यांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर काही राजकीय लोकांनी ट्विट करुन त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली होती. त्यामुळे या अफवेला आणखी बळकटी मिळाली. त्यांच्या घराबाहेरही चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. परंतु, धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल यांनी त्यानंतर हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले. तसेच हेमा मालिनी आणि सनी देओल यांनाही ही केवळ अफवा असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची विचारपूस करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी रुग्णालयात धाव घेतली. सोमवारच्या रात्री, अनेक सेलिब्रिटींना धर्मेंद्र यांची भेट घेताना पाहिले गेले. यामध्ये सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा आणि अभिनेत्री अमीषा पटेल यांचा समावेश होता. या कलाकारांनी रुग्णालयात जाऊन धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी, अभिनेते आमिर खान हे देखील त्यांची सहकारी गौरी स्प्रॅट यांच्यासह धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले.
धर्मेंद्र हे भारतीय सिनेमातील एक मोठे आणि महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेत. शोले, चुपके चुपके, आणि फूल और पत्थर यांसारख्या क्लासिक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यांचा वारसा आजही प्रेरणादायक आहे. ते नुकतेच रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. सध्या त्यांचे चाहते त्यांच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांचा आगामी चित्रपट 'इक्कीस', ज्याचे दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहेत आणि ज्यात अगस्त्य नंदा हे सह-कलाकार असतील, तो 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.