
पुणे - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल संगीता बिजलानी, ज्यांना ‘बिजली’ म्हणून ओळखले जाते, त्या सध्या एका मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात त्यांच्या फार्महाऊसवर चोरी झाल्याचे उघड झाले आहे. चोरट्यांनी संपूर्ण फार्महाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली असून, या घटनेची नोंद घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
संगीता बिजलानी बर्याच महिन्यांनंतर आपल्या फार्महाऊसवर गेल्या तेव्हा त्यांना या घटनेबाबत समजले. त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, फार्महाऊसच्या मुख्य गेटचं कुलूप आणि खिडकीची ग्रिल तुटलेली होती. एक टीव्ही सेट गायब होता, तर दुसरा पूर्णपणे खराब करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, बिछाने, फ्रीज आणि इतर अनेक घरगुती वस्तूंमध्येही तोडफोड झालेली होती.
पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत संगीता यांनी सांगितले, “माझ्या वडिलांच्या तब्येतीमुळे मी फार्महाऊसवर येऊ शकले नव्हते. आज मी दोन घरकाम करणाऱ्या महिलांसह तिथे गेले होते. तेथे पोहोचल्यानंतर आम्हाला धक्का बसला. मुख्य गेट तुटलेले होते आणि आत गेल्यावर खिडकीची ग्रिल तुटलेली होती. एक टीव्ही गायब तर दुसरा पूर्णपणे फोडलेला होता.”
त्यांनी पुढे नमूद केले की, फार्महाऊसच्या टॉप फ्लोरवर खूप तोडफोड करण्यात आली आहे. सर्व बिछाने फोडले गेले होते आणि घरातील अनेक मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या आहेत.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना लोनावळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले की, “घटनेच्या तपासासाठी एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. चोरी आणि नुकसान याबाबतची चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.”
संगीता बिजलानी यांनी केवळ १६ व्या वर्षी मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलं. १९८० मध्ये त्यांनी ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि ‘त्रिदेव’, ‘विष्णु देवा’, आणि ‘युगांधर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.
ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे आणि पोलिसांकडून लवकरच तपासाचा अहवाल अपेक्षित आहे.