अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

Published : May 27, 2025, 10:37 PM IST
Ashok Saraf

सार

महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोहळ्यात उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री उपस्थित होते. सराफ यांनी कुटुंबीय, सहकलाकार आणि प्रेक्षकांचे आभार मानले.

मुंबई: महाराष्ट्राचे लाडके 'अभिनय सम्राट' आणि 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांना मंगळवारी (२७ मे रोजी) दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरला.

दिल्ली दरबारी ‘मामां’चा खास सन्मान

राष्ट्रपती भवनात आयोजित या सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एकूण ६८ दिग्गजांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यापूर्वी, ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकूण १३९ प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावांची घोषणा करण्यात आली होती, ज्यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. कला आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांचाही या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

"हा पुरस्कार म्हणजे आयुष्यात काहीतरी काम केलंय याची पोचपावती!"

पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत अशोक सराफ यांनी आपला आनंद व्यक्त केला. "ही एक आनंदाची गोष्ट आहे, अशाप्रकारे सन्मान होणं ही एक मोठी बाब आहे. हा पुरस्कार एक उच्चस्तरीय सन्मान आहे. मला आनंद आहे की, या पुरस्कारासाठी मला पात्र समजण्यात आले, म्हणजे मी आयुष्यात नक्कीच काहीतरी काम केलं आहे," असे ते म्हणाले. त्यांच्या या भावनांनी त्यांचा नम्र स्वभाव पुन्हा एकदा दिसून आला.

 

 

कृतज्ञतेची पोस्ट: कुटुंब, सहकलाकार आणि प्रेक्षकांचे आभार

पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण शेअर करताना अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली. "पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार — तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या," असे त्यांनी म्हटले. या सोहळ्याला त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, अभिनेत्री निवेदिता सराफ आणि भाऊ सुभाष सराफ उपस्थित होते. अशोक सराफ यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

कला क्षेत्रातील इतर पद्म पुरस्कार विजेते

या सोहळ्यात अशोक सराफ यांच्यासोबत कला क्षेत्रातील इतरही अनेक दिग्गजांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले. यामध्ये गायक पंकज उधास (मरणोत्तर- पद्मभूषण), अभिनेते नंदमुरी बालकृष्ण (पद्मभूषण), अभिनेते अजित कुमार (पद्मभूषण), फिल्म निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर (पद्मभूषण), अभिनेता अनंत नाग (पद्मभूषण), गायक अरिजीत सिंह (पद्मश्री), अभिनेत्री ममता शंकर (पद्मश्री) यांच्यासह अनेक प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. यापूर्वी २८ एप्रिल रोजी झालेल्या सोहळ्यातही ७१ जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?