कोल्हापूर हादरले ! लिव्ह-इन-रिलेशनशिपनंतरही लग्नाला नकार, युवतीची निर्घृण हत्या

Published : Jun 04, 2025, 10:02 AM ISTUpdated : Jun 04, 2025, 11:06 AM IST
Kolhapur Crime

सार

कोल्हापूरमध्ये लिव्हइन मध्ये राहणाऱ्या महिला पार्टनरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये महिला पार्टनरने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. 

Kolhapur Crime : कोल्हापूरमध्ये मंगळवारी दुपारी घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असूनही लग्नास नकार दिल्याने संशयिताने युवतीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सरनोबतवाडी येथे उघडकीस आली आहे. या घटनेत २३ वर्षीय समीक्षा भारत नरसिंगे उर्फ बागडी हिचा चाकूने छातीत वार करून खून करण्यात आला. तर संशयित आरोपी सतिश मारूती यादव (२५, रा. शिवाजी पेठ) हा सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

समीक्षा ही जय भवानी गल्ली, कसबा बावडा येथे आई, लहान भाऊ आणि बहिणीसोबत राहत होती. २०१८ साली तिचे लग्न झालं होतं, परंतु नवऱ्यासोबत पटत नसल्याने तीन महिन्यांतच ती माहेरी परत आली होती. ती इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात कार्यरत होती आणि याच कामातून तिची ओळख तेलंगणाहून आलेली आयशू आंपले आणि कोल्हापुरातील सतिश यादवशी झाली. मागील तीन महिन्यांपासून हे तिघं सरनोबतवाडीतील एका फ्लॅटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, सतिश आणि समीक्षामध्ये सतत वाद होत असल्याने आठ दिवसांपूर्वी समीक्षा आणि आयशू दोघी कसबा बावड्यातील आईकडे परतल्या होत्या.

मंगळवारी दुपारी समीक्षा आणि आयशू त्या फ्लॅटवर आपलं सामान घेण्यासाठी गेल्या होत्या. हे समजताच संतप्त अवस्थेत सतिश तिथे पोहोचला. रागाच्या भरात त्याने समीक्षाला खोलीत घेऊन जाऊन छातीत धारदार चाकूने वार केला. हल्ला इतका भीषण होता की चाकू तिच्या बरगड्यांत अडकला होता. हल्ला करून आरोपीने खोलीला बाहेरून कडी लावली आणि दुचाकीवरून पसार झाला. आयशूने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो बाहेरून बंद असल्यामुळे ती काही करू शकली नाही.

आयशूने लगेचच वसगडे येथील मित्र अभिषेक सोनवणे याला फोन करून माहिती दिली. अभिषेक घटनास्थळी येत दरवाजा उघडून आत गेला, तेव्हा समोर रक्ताच्या थारोळ्यात समीक्षा पडलेली होती. त्यांनी तातडीने समीक्षाला रिक्षामधून रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि सीपीआर रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि मित्रांनी एकच गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि इतर पोलिस पथके रुग्णालयात दाखल झाली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास सुरू करण्यात आला असून करवीर, गांधीनगर पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी तपासात गुंतले आहेत. आरोपी सतिश यादव पसार असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. मुलीचा मृतदेह पाहून आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. कोल्हापुरात ही घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Hyderabad Crime : रियल इस्टेट व्यावसायिकाची निर्घृण हत्या, थरारक घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)
Gujarat Crime : लज्जास्पद! 6 वर्षीय मुलीसोबत निर्भयासारखा अत्याचार, गुप्तांगात घातला रॉड