
मुंबई : ठाणे जिल्ह्यात १८ हजार रुपयांचं कर्ज एका कुटुंबाच्या जीवावर बेतलं आहे. कर्ज परत न केल्याने एका सावकाराने तरुणाची नखं उपटण्याची आणि बोटं छाटण्याची धमकी दिली. या धमकीमुळे तरुणाला मोठा मानसिक धक्का बसला आणि त्यातच मुंबईतील एका रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी एका बेकायदा सावकारावर गुन्हा दाखल केला आहे.
आबिद सय्यद (वय ४२) असं या आरोपीचं नाव आहे. मे २०२५ मध्ये घेतलेल्या कर्जावरून त्याने कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली. तक्रारदार शम्मू बापुमिया पिंजारी (वय ६०) यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या कुटुंबाने सय्यदकडून १८ हजार रुपये कर्जाऊ घेतले होते.
ठरलेल्या अटींनुसार, कुटुंबाला ४० दिवसांसाठी रोज ३०० रुपये द्यायचे होते. पिंजारी यांनी आरोप केला आहे की, त्यांनी रोख हप्त्यांमध्ये ७,५०० रुपये परत केले होते. पण तरीही आरोपी वाढत्या व्याजाच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी करत होता.
८ ऑक्टोबर रोजी सय्यद त्यांच्या घरी आला आणि त्याने पिंजारी यांच्या मुलाकडे व्याजापोटी २०,५०० रुपयांची मागणी केली.दोन दिवसांत पैसे दिले नाहीत, तर तरुणाची नखं उपटून काढेन, जखमांवर लाल तिखट चोळेन आणि बोटं छाटून टाकेन, अशी भयंकर धमकी आरोपीने दिली. पीटीआयने पोलिसांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
या धमकीनंतर तरुण खूप आजारी पडला. त्याला उपचारांसाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथे १३ ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी सय्यद विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायद्यांतर्गत एफआयआर (FIR) दाखल केला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. सध्या सय्यद फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण आणि सावकारावरील आरोपांची सध्या चौकशी सुरू आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.