२२ महिन्यांचा पगार मागितल्यावर मिळाली मृत्यूची शिक्षा; स्वयंपाक्याचा अमानुष खून, दोन आरोपी अटकेत

Published : May 05, 2025, 06:53 PM IST
Murder

सार

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्र येथे २२ महिने काम केलेल्या स्वयंपाक्याचा थकीत पगार मागितल्यावर हॉटेल मालक आणि मॅनेजरने निर्घृण खून केला. डोळे फोडून, गुप्तांग ठेचून आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून त्याला मृत्यूमुखी पाठवण्यात आले.

सिल्लोड: "पगार मागायचा गुन्हा असतो का?" असा संतप्त सवाल निर्माण करणारी धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे घडली आहे. २२ महिने प्रामाणिकपणे काम केलेल्या तरुण स्वयंपाक्याने थकीत पगाराची मागणी केल्यावर, त्याचा हॉटेलमधील मालक आणि मॅनेजरने निर्घृण खून केला. केवळ पगार मागितल्यामुळे त्याचे डोळे फोडण्यात आले, गुप्तांग ठेचण्यात आले आणि लाठ्याकाठ्यांनी अक्षरशः ठेचून त्याला मृत्यूमुखी पाठवण्यात आले.

मृत तरुणाची ओळख

अतुल प्रल्हाद पाडळे (वय २१, रा. वाकडी, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृत स्वयंपाक्याचे नाव आहे. तो सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावातील ‘संस्कार बिअर बार’मध्ये गेल्या २२ महिन्यांपासून स्वयंपाकी म्हणून काम करत होता.

थकीत पगार मागितला, आणि…

घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अतुलने महिन्याचा पगार न घेता एकत्रित रक्कम घेण्याचे मालकाशी ठरवले होते. भावाच्या लग्नासाठी पैसे लागणार असल्यामुळे ३० एप्रिल रोजी त्याने आपल्या थकीत ₹२.८६ लाख पगाराची मागणी केली. मात्र मालक मनीष जयस्वाल व मॅनेजर दिनेश परदेशी यांनी पगार देण्यास नकार दिला आणि रागाच्या भरात त्यांनी त्याच्यावर क्रूर हल्ला चढवला.

माणुसकीला काळिमा; अमानुष हत्येचा थरारक तपशील

स्वतःच्या कष्टाची मागणी केल्यामुळे अतुलला हॉटेलच्या बंद खोलीत लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचे डोळे फोडण्यात आले आणि गुप्तांग अत्यंत क्रूर पद्धतीने ठेचण्यात आले. हा हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच अतुलचा मृत्यू झाला.

अकस्मात मृत्यूचं नाटक, पण...

या घटनेनंतर हॉटेल मालकाने अतुलचा मृत्यू ‘अकस्मात’ झाल्याचं सांगितलं. मात्र, शवविच्छेदन अहवालात सत्य समोर आलं – अतुलचा मृत्यू बेदम मारहाण आणि गुप्तांग गंभीर जखमी झाल्यामुळेच झाला होता. कुटुंबीयांनी मृतदेह पाहताच संशय व्यक्त केला आणि शेवटी ४ मे रोजी अतुलचे वडील प्रल्हाद पाडळे यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलीस यंत्रणेत खळबळ; दोघे आरोपी अटकेत

या तक्रारीनंतर पोलिसांनी अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम व इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी मालक मनीष जयस्वाल आणि मॅनेजर दिनेश परदेशी या दोघांना अटक केली. सध्या या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे आणि फौजदार लहू घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

एक प्रश्न अजून अनुत्तरितच...

२२ महिन्यांपासून निःशब्दपणे कष्ट करणाऱ्या अतुलने फक्त त्याचा हक्क मागितला होता. तो हक्क इतका मोठा होता की त्याबदल्यात त्याला अमानुष मृत्यूची शिक्षा मिळाली? समाज, व्यवस्थापन आणि माणुसकीवरच ही घटना एक मोठा सवाल उभा करतेय.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून