मध्य प्रदेशात भाजप आमदार अम्ब्रीश शर्मा यांची धडाकेबाज एण्ट्री, युवकाला मारहाण करणाऱ्या गुंडांवर बंदूक रोखून जीव वाचवला!

Published : May 03, 2025, 09:59 PM IST
ambrish sharma

सार

भिंडमध्ये भाजप आमदार अम्ब्रीश शर्मा यांनी रस्त्यावर तरुणाला मारहाण करणाऱ्या गुंडांना बंदूक दाखवून पळवून लावले. युवराज सिंह राजावत या तरुणाचे अपहरण करून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल असतानाही पोलिसांनी कारवाई केली नव्हती.

भोपाळ: भिंड जिल्ह्यातील लहार विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अम्ब्रीश शर्मा गुरुवारी दुपारी खऱ्या अर्थानं "ऍक्शन हिरो" ठरले. रस्त्यावर एका युवकाला मारहाण करणाऱ्या मास्क घातलेल्या गुंडांच्या टोळीसमोर त्यांनी आपल्या गाडीतील बंदूक काढली आणि त्यांना थेट पळवून लावले. ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

घटना भिंडच्या रावटपुरा सानी फाट्यावर घडली. आमदार शर्मा आपल्या वाहनातून जात असताना काही लोक एका तरुणाला कारमधून खेचून बाहेर काढून लाठ्यांनी मारत असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी थांबवली, उतरले आणि आपल्या वाहनातून बंदूक काढली. हातात बंदूक असलेला आमदार समोर दिसताच गुंडांनी धूम ठोकली.

या युवकाचं नाव युवराज सिंह राजावत असून, त्याने शिवम दुबे, सत्यम गोस्वामी, राहुल शर्मा, हर्ष शर्मा आणि विश्ववेंद्र राजावत या पाच जणांकडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ३० लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं.

युवराजच्या म्हणण्यानुसार, त्याने आतापर्यंत ४२ लाख रुपये परत दिले आहेत. तरीही हे लोक आता ८० लाखांची मागणी करत आहेत आणि खोटं सांगत आहेत की त्याने अजून ५० लाखांचं दुसरं कर्ज घेतलं आहे.

यापूर्वी जानेवारी महिन्यातही त्याच पाच जणांनी त्याचं अपहरण करून जयपूर, खाटू श्याम आणि धौलपूर या ठिकाणी घेऊन जात त्याच्यावर अमानुष मारहाण केली होती आणि नंतर घरी आणून सोडलं. युवराजने सांगितलं की त्याने या घटनेबाबत एसपी कार्यालयात तक्रार दाखल केली होती, मात्र पोलीसांनी एफआयआर नोंदवलेला नाही.

लहार पोलिसांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं, “आमच्याकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. पीडिताने पुढे येऊन अधिकृत तक्रार केल्यास, आम्ही पूर्ण मदत करू.”

घटनेबाबत आमदार अम्ब्रीश शर्मा यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, "अशा प्रकारची गुंडगिरी अजिबात सहन केली जाणार नाही. कुणालाही जर धमकावलं जात असेल, तर त्यांनी थेट पोलिसांकडे जावं आणि गरज भासल्यास मी स्वतः मदतीला धावून येईन."

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून