
Shirdi Crime News: अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि मौजमजा करण्याच्या नादात सात अल्पवयीन मुलांनी एका ४२ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव गणेश सखाहरी चत्तर असून, ते कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील रहिवासी होते.
गणेश चत्तर हे ८ जूनपासून बेपत्ता होते. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर पोलिसांना नांदुर्खी बुद्रुक गावाजवळील उसाच्या शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या पाठीवर धारदार शस्त्राचे वार आढळले. तपासाअंती मृत व्यक्ती गणेश चत्तर असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, गणेशचा मोबाईल एका दुकानदाराला ४,५०० रुपयांना विकल्याचे उघडकीस आले. या पैशांतून अल्पवयीन आरोपींनी वाढदिवसाची पार्टी केली होती. या मोबाईलपैकी एकाने पुन्हा तो मोबाईल वापरण्यास सुरुवात केली आणि तिथूनच पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला.
तपासात समोर आले की, गणेश चत्तर रस्त्याने पायी जात असताना नशेत असलेल्या अल्पवयीन मुलांनी त्यांचे अपहरण केले. त्यांनी गणेश यांना उसाच्या कांडक्याने आणि हाताने मारहाण केली, गळा दाबला आणि नंतर चाकूने वार करून त्यांची हत्या केली. मृतदेह उसाच्या शेतात टाकून त्यांनी मोबाईल फोन चोरला आणि विकला. या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी सात अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती वाढत असल्याचे ही घटना स्पष्ट करते. काही दिवसांपूर्वी झोपलेल्या व्यक्तीला मारहाण करून लुटले गेले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत साईबाबा संस्थानमध्ये काम करणाऱ्या तरुणाचीही निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या प्रकारामुळे समाजात चिंता वाढली आहे. अल्पवयीनांमध्ये वाढत चाललेली हिंसा आणि व्यसनाधीनता रोखण्यासाठी पालक, शिक्षक, समाजकार्यकर्ते आणि पोलिस प्रशासनाने एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.