
अनेक महिने भयंकर डोकेदुखी आणि दुहेरी दिसण्याच्या (डबल व्हिजन) समस्येने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्यात चक्क एक रोपटे वाढत असल्याचं समोर आलं आहे. ४२ वर्षीय मॅक्सिम स्लेप्टसोव्ह यांच्या डोळ्यातील पांढऱ्या नाजूक भागात एका बीने चक्क मूळ धरलं होतं. हे पाहून डॉक्टरही थक्क झाले.
रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सर्जन्सनी हे मोड आलेलं बी बाहेर काढलं, तेव्हा त्याची मुळे जवळपास एक इंच खोलवर रुजली असल्याचं त्यांना आढळलं.
या रशियन नागरिकाला डोळ्यांची जळजळ, डबल व्हिजन आणि असह्य डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सायबेरियात राहणारे आणि वेल्डर व प्लंबर म्हणून काम करणारे मॅक्सिम उन्हाळ्याच्या सुट्टीत अबिस्की (Abyysky) या अतिदुर्गम भागात गेले होते. तिथे ते एका मित्रासोबत मासेमारी करण्यासाठी आणि बेरी गोळा करण्यासाठी गेले असताना त्यांच्या या त्रासाला सुरुवात झाली.
"एका झाडाची फांदी माझ्या चेहऱ्यावर आदळली आणि थेट डोळ्याला लागली," असं त्यांनी सांगितलं. "माझ्या डोळ्याला खाज सुटली होती आणि खूप दुखत होतं. जणू काही डोळा सोलवटून निघालाय असं वाटत होतं. डोळा पूर्ण लाल झाला होता आणि त्यातून सतत पाणी येत होतं."
डोळा धुतल्यानंतर आणि लाकडाचा एक छोटा तुकडा काढल्यानंतर, आता सगळं ठीक झालंय असं त्यांना वाटलं. पण त्यांच्या नकळत एक छोटंसं बी त्यांच्या डोळ्यात तसंच अडकून राहिलं होतं.
पुढचे चार महिने त्यांनी असह्य डोकेदुखी आणि अंधुक होत जाणारी दृष्टी सहन केली. जेव्हा वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या, तेव्हा त्यांना जाणवलं की सर्वात जवळचं डोळ्यांचं रुग्णालय या जगातील सर्वात दुर्गम भागातून शेकडो मैल दूर आहे. "मला सतत मायग्रेनचा त्रास होत होता. सकाळी उठल्यावर माझं डोकं भयंकर दुखायचं," असं ते म्हणाले.
त्यांची दृष्टी आणखी कमकुवत झाली आणि त्यांना दोन्ही डोळ्यांनी पाहताना त्रास होऊ लागला. प्रादेशिक राजधानी याकुत्स्क (Yakutsk) येथे परतल्यावर त्यांनी तातडीने 'इमर्जन्सी ऑप्टोमेट्री सेंटर' गाठलं. तिथेच डॉक्टरांना हा धक्कादायक प्रकार आढळून आला.
डॉक्टरांना दिसलं की, त्या बीला एक छोटं मूळ फुटलं होतं आणि ते डोळ्याच्या पांढऱ्या भागावर असलेल्या 'कंजंक्टिवा' (conjunctiva) या नाजूक पडद्यात घुसलं होतं. मुख्य चिकित्सक इव्हान लुत्स्कन म्हणाले, "सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या बीला मोड आले होते आणि त्याचं मूळ प्रत्यक्षात कंजंक्टिवल टिश्यूमध्ये शिरलं होतं."
नेत्ररोगतज्ज्ञ एलिझाव्हेटा कार्पोव्हा यांनी लोकल भूल देऊन इंजेक्शनच्या सुईच्या मदतीने ते मोड आलेलं अतिसूक्ष्म बी बाहेर काढलं. "माझ्या आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये मी अशी केस कधीच पाहिली नव्हती. या बीचं मूळ जवळपास ३ मिमी लांबीपर्यंत वाढलं होतं," असं त्या म्हणाल्या.
आता मॅक्सिम यांची डोकेदुखी पूर्णपणे थांबली आहे. ते म्हणाले, "ज्या बीने मुळं धरायला सुरुवात केली होती, ते त्यांनी काढून टाकलं. मला इतका दिलासा मिळालाय की आता बाकी कशाचीच पर्वा नाही."