धक्कादायक! पैश्यांसाठी मैत्रिणीचे अपहरण केले, खून करून जाळून पुरले

विमाननगर भागातील फिनिक्स मॉलमधून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे. अभियांत्रिकी शाखेतील तरुणीचा खून तिचा मित्राने साथीदारांच्या मदतीने केला.

पुणे : विमाननगर भागातील फिनिक्स मॉलमधून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे. अभियांत्रिकी शाखेतील तरुणीचा खून तिचा मित्राने साथीदारांच्या मदतीने केला. त्यानंतर तिचा मृतदेह पुणे-नगर हायवेवर असणाऱ्या कामरगाव गावच्या हद्दीतील मोकळ्या जागेत जाळून पुरल्याचे उघडकीस आले. अपहरणाची ही घटना 30 मार्च रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती.

खंडणीसाठी तरुणीचे अपहरण करायचे, मात्र तिला जिवंत सोडायचे नाही, हे ठरवूनच आरोपींनी तरुणीला नेले. 'जेवण करायला चल' म्हणून तिला सोबत घेऊन जात काही तासांतच तोंड दाबून खून केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे, तरुणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी एक दिवस आधीच (२९ मार्च) शंभर किलोमीटर जाऊन खड्डा खणून ठेवला होता, असेदेखील आरोपींनी पोलिसांना सांगितले. तरुणीचा खून केल्यानंतर मृतदेह ओळखू नये, यासाठी तिघांनी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला आणि त्यानंतर खड्यात पुरला. त्यासाठी एका दुकानातून टिकाव, फावडेदेखील खरेदी केले होते. दरम्यान, भाग्यश्रीच्या खुनाचा कट आरोपींनी अतिशय शांत डोक्याने रचला होता.

भाग्यश्री सूर्यकांत सुडे (२२, रा. लिव्हिंग प्रिसो हाउस, साकोरेगनर, विमानगर, मूळ. रा. हरंगुळ बुद्रुक, ता. जि. लातूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी, विमानतळ पोलिसांनी शिवम माधव फुलवळे (२१, रा. ऑक्सी हेवन सोसायटी, वाघोली, मूळ, नांदेड), सुरेश शिवाजी इंदोरे (२३, रा. मुंबई, मु, सकनूर, नांदेड) आणि सागर रमेश जाधव (२३, रा. कासलेवाडी, ता. शिरोळा, अनंतपाळ, जि. लातूर) यांना अटक केली आहे.

खून करून खंडणीची मागणी : 

भाग्यश्रीचे ज्या दिवशी अपहरण करण्यात आले, त्याच दिवशी काही तासांनी तिचा खून करण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांनी तिच्या मोबाइलवरून मेसेज करून ९ लाखांच्या खंडणीची मागणी केली. भाग्यश्रीचा मोबाइल आरोपींकडे होता. आरोपी तिच्या आईचा मेसेज आल्यानंतर तिच्याशी बोलत होते. दोन दिवसांनी म्हणजे, २ एप्रिल रोजी आरोपींनी तिच्या कुटुंबाशी संपर्क साधून खंडणीची मागणी केली. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

असा झाला खुनाचा उलगडा :

शिवम फुलवळे हा मुख्य सूत्रधार असून, तो भाग्यश्रीसोबत एकाच महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिवमने सुरेश आणि सागर या मित्रांना पैशांचे प्रलोभन दाखवले, आपण केवळ भाग्यश्रीला घाबरवत आहोत असे सांगितले, एकदा का पैसे मिळाले, की संपले असे तो सांगत होता, मात्र, शिवमच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू होता. भाग्यश्रीचे अपहरण, खून, मृतदेहाची विल्हेवाट याबाबत त्याने खबरदारी घेतली. खंडणीचे पैसे शिवम भाग्यश्रीच्या बँक खात्यावर मागत होता. त्याने भाग्यश्रीच्या फोन पे चा अॅक्सेस स्वतःकडे घेतला. तो घेताना त्याने स्वतःचा मोबाइल क्रमांक दिला. यामुळे जनरेट झालेला पिन त्याच्या मोबाइलवर आला, यावरुन पोलिसांना शिवम याचा संपर्क क्रमांक मिळाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. याच वेळी दुसऱ्या पथकाला सुरेश आणि सागर या दोघांची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांचा पॅटर्न राबवला. त्यानंतर आरोपींनी भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगितले.

आणखी वाचा :

पिंपरी-चिंचवड येथील स्पा मध्ये चालण्याऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांची धाड, तीन महिलांची सुटका

माणूस आहे की राक्षस ? पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले २०० हुन अधिक तुकडे; नंतर मृतदेह मित्राच्या मदतीने फेकला नदीत

Share this article