
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका तरुणीने डिलिव्हरी बॉयवर लैंगिक अत्याचार आरोप केल्याचा गाजावाजा झाला होता. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पोलिस तपासात असे स्पष्ट झाले आहे की, लैंगिक अत्याचाराची तक्रार करणाऱ्या तरुणीने खोटा बनाव केला होता आणि ती तक्रार पूर्णतः फसवी होती. त्यामुळे पोलिसांनी आता उलट तिच्यावरच कारवाई केली आहे.
फिर्यादी तरुणीवर अदखलपात्र गुन्हा
कोंढवा पोलिस ठाण्यात खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित २५ वर्षीय तरुणीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात समोर आलं की, तिने ज्या तरुणावर आरोप केला होता, तो खरंतर तिचाच मित्र होता. पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन सखोल चौकशी केली आणि त्यानंतरच हा खुलासा केला.
नेमकं काय घडलं होतं?
२ जुलै रोजी या तरुणीने तक्रार दाखल करताना सांगितलं होतं की, एक तरुण कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून तिच्या घरात शिरला आणि तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, त्याने तिचे फोटो काढले आणि 'मी पुन्हा येईल' असा मेसेज लिहून ठेवला, असे तिने आपल्या फिर्यादीत नमूद केले होते. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सत्य काही वेगळंच निघालं
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांना अनेक धागेदोरे मिळाले आणि चौकशीच्या वेळी तरुणीचा बनाव उघडकीस आला. संबंधित आरोपी कोणताही कुरिअर बॉय नसून, तो तिचा मित्र असल्याचं आणि त्यांच्यात संमतीने फोटो काढण्यात आल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं.
खोटी तक्रार महागात पडली
पोलिसांनी याप्रकरणी संबंधित तरुणीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी स्पष्ट केलं की, अशा प्रकारे खोटी तक्रार करून पोलिस यंत्रणेला गृहीत धरणं किंवा चुकीच्या दिशेला वळवणं खपवून घेतलं जाणार नाही. योग्य तपासानंतरच कारवाई करण्यात आली असून, अशा खोट्या तक्रारींमुळे खरे पीडित अन्यायाला बळी पडू शकतात, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.