
सातारा : साताऱ्यात एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करत, थेट तिच्या गळ्यावर चाकू ठेवत तिला धमकावले. मात्र, प्रसंगावधान राखून नागरिकांनी धाडस दाखवले आणि मुलीचा जीव वाचवला. ही घटना सातारच्या बसप्पा पेठ, करंजे परिसरात घडली असून, त्यामुळे संपूर्ण भागात खळबळ माजली आहे.
या माथेफिरू युवकाचे पीडित शाळकरी मुलीवर एकतर्फी प्रेम होते. याआधीही त्याने तिला त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी मात्र त्याने सीमाच ओलांडली. त्याने त्या मुलीला रस्त्यावरच ताब्यात घेतलं आणि गळ्यावर धारदार चाकू ठेवत धमकावलं.
घटनेच्या वेळी परिसरात गर्दी जमली होती. अनेकांनी त्या तरुणाला विनवणी केली, परंतु तो हट्टावर ठाम होता. उलट जमावाला तिथून हटण्यास सांगत होता. त्या मुलीनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण मग एक तरुण कंपाऊंडवरून मागून त्याच्यावर झडप घालतो आणि इतरांनीही त्याच्यावर हल्ला चढवून चाकू हिसकावून घेतला.
ज्या युवकाने मुलीला धमकावले होते, त्याला संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला. त्यानंतर तातडीने पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, त्याला अटक केली. या युवकाचे मागील काळातील गैरप्रकार उघडकीस येत असून, स्थानिकांनी याआधीही त्याच्या त्रासाची तक्रार केल्याचे सांगितले आहे.
दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः शाळकरी मुली आणि महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, स्थानिक पोलीस प्रशासनाकडे परिसरात गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.