
Nagpur Crime : आजकाल बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडमधील भांडणं काही नवीन नाहीत. पण ती योग्य संवादाने आणि समजुतीने सोडवणे गरजेचे आहे. भावनिक उद्रेकात चुकीचे शब्द न वापरणे, शांत राहून ऐकून घेणे, आणि अहंकाराला मध्ये न आणता माफी मागणे किंवा दिलगिरी व्यक्त करणे यातून नात्यातील दुरावा टाळता येतो. भांडण मिटवण्यासाठी संवाद, संयम आणि एकमेकांना समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
मात्र नागपूरमधील एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. कळमेश्वर रोडवरील फेटारी गावाजवळील एका OYO हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडचे आयुष्य संपवले. मृत तरुणीचं नाव रुचिता भांगे असून प्रेमप्रकरणातून घडलेल्या या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण जोडपं नागपूरच्या कळमेश्वर रोडवरील फेटारी गावातील एका हॉटेलमध्ये थांबायला गेलं होतं. OYO हॉटेलमध्ये दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. यानंतर बॉयफ्रेंडने रुचिता भांगेच्या गळ्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या रुचिताचा काही वेळातच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार झाल्यावर आरोपी बॉयफ्रेंड हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून गेला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार बॉयफ्रेंडचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचं नाव रुचिता भांगे असून तिचं वय सुमारे 22 वर्षे होतं. या घटनेतील बॉयफ्रेंडचं नाव सौरव जामगडे आहे. पोलिसांनी सांगितलं की, रुचिता आणि सौरव काल संध्याकाळी फेटारी परिसरातील OYO हॉटेलमध्ये गेले होते. दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. हॉटेलमध्ये थांबले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेल्याचं म्हटलं जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांमधील वाद वाढताच सौरवने रागाच्या भरात रुचिताच्या गळ्यावर चाकूने वार केले. ती गंभीर जखमी झाली आणि काही वेळाने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सौरव फरार झाला. आज सकाळी, जेव्हा रूममधून काहीच हालचाल झाली नाही, तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. आतलं दृश्य पाहून हॉटेल कर्मचारी हादरले. संपूर्ण खोलीत रक्तच रक्त होतं. यावेळी, रुचिता मृतावस्थेत आढळली. यानंतर, पोलीस घटनास्थळी पोहोचले, पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सौरवसाठी अनेक पथकं पाठवली आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.