
नोएडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री नूडल्स खाऊन झोपलेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचा घरातच संशयास्पद मृत्यू झाला. ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा भागात ही घटना घडली. महेश (३७), त्याची पत्नी ललिता (३५) आणि त्यांची मुले लाडू (११), मिष्टी (७) आणि साक्षात (३) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मृत्यूचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अन्न सुरक्षा विभागाने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
एका मुलाची परीक्षा असल्याने त्याला उठवण्यासाठी गेले असता, कुटुंबातील पाचही जण मृतावस्थेत आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी रात्री १० च्या सुमारास जेवण केले होते. आदल्या रात्री कुटुंबाने नूडल्स खाल्ले होते, असा जबाब महेशच्या आईने पोलिसांना दिला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि अन्न सुरक्षा विभागाने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. मालमत्तेच्या वादातून घरात नेहमी भांडणे होत असत, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. महेशच्या आईने सर्व संपत्ती आपल्या मुलीच्या नावावर केली होती आणि महेशच्या कुटुंबाला घर रिकामे करण्यास सांगितले होते. जत्रेतून परतल्यानंतर महेशच्या आईनेच त्यांना नूडल्स बनवून दिले होते, असा आरोप शेजाऱ्यांनी केला असून यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व बाजूंनी पोलिसांनी आता सखोल तपास सुरू केला आहे.