
Badlapur crime news : बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. चार वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणात व्हॅन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच बदलापूरमधील शाळेतील अत्याचार प्रकरणाने राज्य हादरले असताना, पुन्हा अशाच घटनेने पालकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक शाळेत नेण्यासाठी चिमुकलीला व्हॅनमधून घेऊन जात होता. याच दरम्यान त्याने व्हॅनमध्येच चिमुकलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर पीडित मुलीला मारहाण करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. सध्या चिमुकलीची वैद्यकीय तपासणी सुरू असून पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. तपासात संबंधित स्कूल व्हॅनकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याचं समोर आलं आहे. कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत व्हॅनचा परवाना रद्द केला असून २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
घटना समोर येताच बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता चेंदवणकर यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी संबंधित व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
या घटनेनंतर संगीता चेंदवणकर यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्कूल व्हॅनसाठी ठरवलेले नियम पाळले गेले नाहीत का? मुलांच्या सुरक्षिततेसाठी असलेली यंत्रणा अपयशी ठरली का? असे सवाल त्यांनी उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.