
मुंबई: मुंबईत रविवारी रात्री उशिरा घडलेल्या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. दहिसरमधील गणपत पाटील नगरमधील झोपडपट्टीत दोन कुटुंबांतील जुन्या वादाला हिंसक वळण लागल्याने तीन जणांचा जीव गेला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हातघाईच्या मारामारीनंतर चक्क कोयते व धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
दहिसरच्या गल्ली क्रमांक १४ मधील राम नवल गुप्ता यांच्या नारळ स्टॉलजवळ रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वादाला सुरुवात झाली. हमीद शेख हा दारूच्या नशेत स्टॉलवर आला आणि गुप्ता यांच्याशी जुना वाद पुन्हा उफाळून आला. पाहता पाहता दोघांनी आपल्या मुलांना पाचारण केलं आणि वातावरण चिघळलं. गुप्ता कुटुंबातील अमर, अरविंद आणि अमित गुप्ता आणि शेख कुटुंबातील अरमान व हसन शेख यांच्यात हाणामारी सुरू झाली. सुरुवातीला मारहाणीने सुरू झालेला वाद काही क्षणांतच धारदार शस्त्रांच्या वापरात बदलला.
या हिंसाचारात राम नवल गुप्ता व त्यांचा मुलगा अरविंद गुप्ता यांचा मृत्यू झाला, तर अमर व अमित गुप्ता गंभीर जखमी झाले आहेत. दुसऱ्या बाजूला हमीद शेख याचाही जागीच मृत्यू झाला असून, त्याचे दोन पुत्र अरमान व हसन शेख हे जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आणि पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी पाहणी केली. मृतदेह शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले असून, दोन्ही कुटुंबांविरुद्ध क्रॉस मर्डरची नोंद सुरू आहे.
पोलीस उपायुक्त भोईटे यांनी सांगितले की, सर्व आरोपी जखमी असल्याने अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.