Parli Crime: परळीतील तरुणाला भररस्त्यात अमानुष मारहाण; धनंजय देशमुखांचा आक्रमक पवित्रा, ‘गुन्हेगारांना कठोर शासन हवे!’

Published : May 17, 2025, 08:26 PM ISTUpdated : May 17, 2025, 08:34 PM IST
dhananjay deshmukh

सार

परळी तालुक्यातील लिंबुटा गावातील युवक शिवराज दिवटे याला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून, धनंजय देशमुख आणि ज्योती मेटे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

परळी: बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील लिंबुटा गावातील युवक शिवराज दिवटे याला १० ते १२ जणांच्या टोळक्याने भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे.

धनंजय देशमुख थेट रुग्णालयात भेटीसाठी दाखल

या प्रकरणात आता सामाजिक आणि राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन जखमी शिवराज दिवटेची भेट घेतली असून, या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीची चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. मी लवकरच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेणार आहे."

‘गुन्हेगारांच्या रेकॉर्डवर नजर हवी’, देशमुख यांची मागणी

धनंजय देशमुख म्हणाले, “या युवकाला कार्यक्रमातील वादाचा राग धरून टोकवाडी शिवारात नेऊन लाठीकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. हल्लेखोर सर्वजण १८ ते २५ वयोगटातील तरुण होते. या घटना जर थांबवायच्या असतील तर अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींचा क्रिमिनल रेकॉर्ड तपासावा लागेल आणि तातडीने कठोर शासन करावे लागेल.”

ज्योती मेटे यांचाही संताप, ‘एफआयआरमध्ये फेरफार नको’

दरम्यान, शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनीही रुग्णालयात शिवराज दिवटेची भेट घेतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पीडित कुटुंबावर दबाव टाकण्यात येतोय. एफआयआरमधील नावे बदलण्याचा प्रयत्न होतोय, हे खपवून घेतलं जाणार नाही. उलट गुन्हेगारांची संख्या वाढली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.”

घटनेचं सविस्तर पार्श्वभूमी

मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे २०२५ रोजी शिवराज दिवटे याचं अपहरण करून त्याला एका कार्यक्रमातील जुन्या वादातून टोकवाडी शिवारात नेण्यात आलं. तिथं १० ते १२ जणांनी त्याच्यावर अमानुष हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड वेगाने सोशल मीडियावर पसरला. सध्या शिवराज याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

थोडक्यात...

घटना: कार्यक्रमातील वादातून युवकावर सामूहिक हल्ला

प्रमुख पीडित: शिवराज दिवटे, लिंबुटा गाव

प्रतिक्रिया: धनंजय देशमुख आणि ज्योती मेटे यांचा आक्रमक पवित्रा

कारवाईची मागणी: कठोर शिक्षा, पार्श्वभूमी तपास, एफआयआरमध्ये फेरफार नको

पोलीस तपास: सुरू असून अधिकाऱ्यांची भेट घेणार

या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक कारवाईची मागणी अधिक तीव्र होत आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून