लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहमदनगर मतदारसंघात मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. नगरमधून विजयी झालेले नीलेश लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला झाला आहे.
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार नीलेश लंके आणि डॉ. सुजय विखे यांच्या चुरशीची लढत झाली. प्रचाराच्या काळातच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमकपणे एकमेकांवर टीका करीत होते. सोशल मीडियातून वाद होते होते. आता निकालानंतर ही खदखद बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. पारनेर तालुक्यात गुरूवारी दुपारी दोन ठिकाणी लंके आणि विखे समर्थकांमध्ये राडा झाला.
पारनेर बसस्थानकाजवळ खासदार लंके यांचे समर्थक अड. राहुल बबन झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचीही तोडफोड केली. यामध्ये जखमी झालेल्या झावरे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुक्यात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.
गुरूवारी दुपारी ही घटना घडली. याची सुरवात गोरेगाव येथून झाल्याचे सांगण्यात येते. पहिली घटना गोरगाव येथे घडली. सोशल मीडियातील वाद यामागील कारण असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर पारनेर शहरात बसस्थानकाजवळची घटना घडली. तेथे राहुल झावरे आपल्या वाहनातून जात असताना हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून हल्ला केला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. झावरे यांनाही मारहाण झाली. त्यात झावरे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनेची नेमकी माहिती घेण्यात येत आहे. त्याचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही. झावरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खासदार लंके समर्थकांनी निषेध केला आहे.
या निवडणुकीत पारनेर तालुक्यात दोघाही उमेदवारांच्या समर्थकांनी टोकाचा विरोध करीत प्रचार केला. प्रचार काळातही छोटेमोठे वाद झाले होते. निकालानंतरही सोशल मीडियातील पोस्टवरून वादाचा भडका उडताना दिसून येत आहे.