महिला मंत्र्याला अश्लील मेसेज! 'सायबर पोलिसांनी' पुण्यामधून उचलले 'महाविद्यालयातील माथेफिरूला'

Published : May 02, 2025, 05:35 PM IST
messages

सार

महाराष्ट्रातील एका महिला मंत्र्यांना सोशल मीडियावर अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. बीडचा रहिवासी असलेला हा तरुण सध्या पुण्यात शिक्षण घेत आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे.

मुंबई: महाराष्ट्रातील एका महिला मंत्र्याला सोशल मीडियावर घाणेरडे संदेश पाठवणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमोल काळे असं या आरोपीचं नाव असून, तो शिक्षण घेत आहे. पोलिसांनी त्याला थेट पुणे शहरातून शोधून काढलं. विशेष म्हणजे, हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी त्याच्या गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त केला असून, आता त्या मोबाईलमधील रहस्य उलगडण्यासाठी तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. या तरुणाने हे कृत्य का केलं, याचा शोध पोलीस घेत आहेत.

नोडल सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी २६ वर्षीय निखिल भामरे यांनी तक्रार दाखल केली आहे. ते मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम पाहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांना राज्यस्तरीय सोशल मीडिया समन्वयक प्रकाश गाडे यांच्याकडून एका महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने राज्यातील एका महिला मंत्र्याला अत्यंत आक्षेपार्ह संदेश पाठवून त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर गाडे यांनी भामरे यांना तातडीने पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.

गाडे यांच्या सल्ल्यानुसार, भामरे यांनी मुंबईच्या नोडल सायबर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि आपली तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७८ आणि ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या मोबाईल नंबरचा सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) काढला, ज्यातून तो नंबर पुण्यातील असल्याचं निष्पन्न झालं. सायबर पोलिसांनी त्वरित ही माहिती पुण्यातील स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर नोडल सायबर पोलिसांच्या एका विशेष पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पुण्यातील भोसरी परिसरात सापळा रचून अमोल काळे (वय २५) याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. कसून चौकशी केल्यानंतर अमोलनेच महिला मंत्र्यांना अश्लील संदेश पाठवून त्रास दिल्याची कबुली दिली. तो बीडच्या परळीचा रहिवासी असून सध्या शिक्षण घेत आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे, ज्यामध्ये त्याने काही संदेश डिलीट केल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. अटकेनंतर त्याला पुढील तपासासाठी मुंबईत आणण्यात आलं आणि कोर्टात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

नोडल सायबर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी एक विद्यार्थी असून तो पुण्यातील भोसरी भागात शिक्षण घेत आहे. त्याने हे कृत्य कोणत्या उद्देशाने केलं, याची तो समाधानकारक माहिती देत नाहीये. त्यामुळे या प्रकरणाचा खरा खुलासा न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच होण्याची शक्यता आहे. आरोपीने यापूर्वी आणखी कोणाला अशा प्रकारे त्रास दिला आहे का, याचाही तपास सायबर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून