Pune Crime: जुन्या वादातून शिरूरमध्ये बिअर बार चालकाची गोळ्या झाडून हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

vivek panmand   | CMS
Published : Sep 19, 2026, 08:15 PM IST
Pune Crime: जुन्या वादातून शिरूरमध्ये बिअर बार चालकाची गोळ्या झाडून हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

सार

पुण्यात जुन्या वादातून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हरीश ऊर्फ हरी गंगावणे असे मृताचे नाव असून रोहित सोनवणे, अनिकेत गव्हाणे आणि आदित्य पवार अशी संशयितांची नावे आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

शिरूर: महाराष्ट्रातील पुण्याच्या शिरूर तालुक्यात शुक्रवारी सकाळी एका ३३ वर्षीय बिअर बार चालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हरीश ऊर्फ हरी दादाभाऊ गंगावणे (रा. प्रीतम प्रकाश नगर, शिरूर) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी रोहित सोनवणे (२३), अनिकेत गव्हाणे (२३) आणि आदित्य पवार (२४) या तिघांना संशयित म्हणून निष्पन्न केले आहे.

अरुंद गल्लीत गंगावणेवर गोळीबार

शिरूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, गंगावणे त्याच्या एका मित्रासोबत दुचाकीवरून जात होता. त्यावेळी या तीन संशयितांनी त्यांचा पाठलाग केला.

आरोपींनी गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. यात एक गोळी गंगावणेला लागली आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत दुचाकीवर मागे बसलेला मित्र मात्र सुदैवाने बचावला.

गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी शिरूर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. तिथून पुंगळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

गंगावणेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय

पोलिसांच्या प्राथमिक तपासात जुन्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. गंगावणेचा एक बिअर बार होता. काही महिन्यांपूर्वी हे आरोपी त्याच्या बारमध्ये गेले होते.

तिथे पैशांवरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी गंगावणेने त्यांना मारहाण केली होती. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

गुरुवारी रात्री आंबेडकर चौकाजवळ संशयितांनी गंगावणेला गाठले होते. तिथेही त्यांच्यात बाचाबाची झाली, पण स्थानिकांनी मध्यस्थी केल्याने ते निघून गेले.

त्यानंतर शुक्रवारी पहाटे गंगावणे त्याच्या मित्रासोबत एका संशयिताच्या नातेवाईकाकडे गेला होता. त्या नातेवाईकाने संशयिताला फोन करून वाद न वाढवण्याचा सल्ला दिला होता.

पण त्यानंतरही या तिघांनी गंगावणेचा पाठलाग करून त्याच्यावर गोळ्या झाडल्या, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील पथके आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.

नेमके काय घडले हे समजून घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Tiger Shroff case | टायगर प्रकरणी ३ ताब्यात; DCP राज तिलक रोशन
Tiger Shroff case | टायगर श्रॉफ प्रकरणी ३ ताब्यात; कोटा SP तेजस्विनी गौतम