
हरियाणातल्या फरिदाबाद येथील बीके सिव्हिल हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये एका मद्यपीने चांगलाच गोंधळ घातला. त्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे. ८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हा व्यक्ती ओपीडी नोंदणी स्लिपशिवाय आपत्कालीन वॉर्ड क्रमांक ३९ मध्ये घुसला आणि आत गोंधळ घालू लागला, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. डोकेदुखीचा त्रास असल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेकडे जाऊन त्याने आपले डोके मसाज करण्याची विनंती केली.
या महिलेच्या पतीने नंतर स्थानिक माध्यमांना सांगितले की, त्या व्यक्तीने पत्नीच्या बेडजवळ ठेवलेल्या जेवणाला स्पर्श केला आणि त्याची चवही घेतली. त्यामुळे ते जेवण खाण्यायोग्य राहिले नाही. त्याच्या या वागण्याने संतापलेल्या कुटुंबाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्याला वॉर्डमधून बाहेर काढण्यास सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक वैद्यकीय कर्मचारी हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या व्यक्तीकडे जाताना दिसत आहे. कर्मचारी त्याला उठवण्याचा आणि चालण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो पण तो व्यक्ती अजिबात प्रतिसाद देत नाही. कर्मचाऱ्याच्या हातात एक काठी असून तो त्याला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तो माणूस एका सेकंदासाठी डोळे उघडतो आणि पुन्हा झोपतो.
स्थानिकांच्या माहितीनुसार, रुग्णाच्या नातेवाईकांनी चिंता व्यक्त करूनही या व्यक्तीला अनेक तास रुग्णालयात ठेवण्यात आले होते. अखेर कर्मचाऱ्यांनी त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवले. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंतर तो कुणाच्याही मदतीशिवाय रुग्णालयातून निघून गेला.
या घटनेमुळे एक मद्यपी व्यक्ती ओपीडी स्लिपशिवाय आपत्कालीन कक्षात कसा प्रवेश करू शकतो आणि कित्येक तास तिथे कसा राहू शकतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपत्कालीन कक्षांचा उद्देश रुग्णांना सुरक्षित वातावरण देणे हा असतो. या घटनेमुळे अभ्यागतांची तपासणी, प्रवेशावर निर्बंध आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी हाताळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
#Faridabad : Drunk Man Create Ruckus at BK Hospital.
#Haryana https://t.co/0PcBNwoLH1
— Vinod Katwal (@Katwal_Vinod) November 10, 2026
स्थानिक माध्यमांनी संपर्क साधला असता फरिदाबादचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत आहुजा यांनी सांगितले की त्यांना या घटनेची माहिती नव्हती.
त्या व्यक्तीची आणि महिलेची ओळख उघड करण्यात आलेली नाही. पोलिसांत तक्रार दाखल झाल्याची किंवा त्या व्यक्तीवर कारवाई झाल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.