
मुंबई : एक २२ वर्षीय तरुणीने पूर्व दिल्लीच्या प्रीत विहार भागातील एका कॅफेमध्ये लेट-नाईट पार्टीनंतर आपल्यावर दोन सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तीन जणांना अटक केली असून बाकीचे तीन आरोपी अजूनही फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे कडकडडूमा येथील क्रॉस रिव्हर मॉलमधील एका कॅफेमध्ये एकत्र काम करतात. सोमवारी, २३ नोव्हेंबरला रात्री ही तरुणी तिच्या सात सहकाऱ्यांसोबत प्रीत विहारमधील 'सल्तनत कॅफे'मध्ये (Saltanate Cafe) पार्टीसाठी गेली होती. कॅफेची नेहमीची बंद होण्याची वेळ रात्री ११.३० असली तरी, एका कर्मचाऱ्याकडे चावी असल्यामुळे आतमध्ये उशिरापर्यंत पार्टी सुरूच होती.
मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास हे सर्वजण तिथून बाहेर पडले. तोपर्यंत त्यांनी दारू प्यायली आणि डान्सही केला. त्यानंतर या तरुणीने दोन तरुणांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे, तसंच इतर सहकाऱ्यांनी त्यांना साथ दिल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली ४ पुरुष आणि २ महिला अशा एकूण ६ जणांवर एफआयआर (FIR) दाखल केला आहे. यातील ३ संशयितांना अटक करण्यात आली असून उरलेल्यांचा शोध सुरू आहे.
प्राथमिक तपासानुसार आणि सीसीटीव्ही फुटेजवरून असं दिसतंय की, ही तरुणी एका मित्रासोबत आणि इतर दोन महिलांसोबत गाडीतून बाहेर पडली आणि पहाटे ५.४५ वाजता पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी पोहोचली. सध्या पोलिस तिचा सविस्तर जबाब नोंदवत आहेत, जो दंडाधिकाऱ्यांसमोरही मांडला जाईल. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.