
Chhatrapati Sambhajinagar Crime : रक्षकच जेव्हा भक्षक बनतो, तेव्हा समाजात अस्वस्थता निर्माण होते. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आली आहे. मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या २३ वर्षीय तरुणीवर ५८ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. मदतीच्या बहाण्याने विश्वास संपादन करून लग्नाचे खोटे आमिष दाखवत तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
या प्रकरणी क्रांती पोलीस चौक येथे संबंधित पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण, त्यांची पत्नी नर्मदा चव्हाण आणि मुलगा सागर चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, ७ मार्च २०२५ रोजी तरुणी मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी तिची ओळख पीएसआयशी झाली.
तक्रारीनुसार, तक्रार दिल्यानंतर त्याच दिवशी आरोपी अधिकाऱ्याने तरुणीला फोन करून “नंबर कन्फर्म करण्यासाठी” संपर्क केल्याचे सांगितले. त्यानंतर वारंवार फोनवर संभाषण सुरू राहिले आणि हळूहळू त्याचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले.लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने शहरातील विविध लॉजवर नेऊन तिच्याशी संबंध ठेवले, असा आरोप आहे. बनावट मंगळसूत्र बांधून ती आपली पत्नी असल्याचा आभास निर्माण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, या काळात तरुणी तीन वेळा गर्भवती राहिली. मात्र तिच्या इच्छेविरुद्ध पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे गर्भपात करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. जानेवारी २०२६ मध्ये आरोपीच्या पत्नी आणि मुलाने मारहाण केल्याने दीड महिन्याचा गर्भपात झाल्याचेही नमूद आहे.
तरुणीने लग्नासाठी आग्रह धरल्यानंतर आरोपीने जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आरोपीची पत्नी आणि मुलानेही पीडितेला धमकावत मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. २८ जानेवारी रोजी पुन्हा “नवऱ्याचा पाठलाग करू नको” असे म्हणत तिला मारहाण केल्याचे नमूद आहे.
शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेतली. या गंभीर आरोपांनंतर संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. प्रकरणामुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.