
कझाकस्तानमध्ये शाळेत जिन्याच्या रेलिंगवरून घसरताना तोल जाऊन एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सहावीत शिकणारा हा मुलगा तिसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या रेलिंगवरून दुसऱ्या मजल्यावर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. आपत्कालीन शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता विभागात उपचार करूनही डॉक्टर त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत. वृत्तानुसार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी कझाकस्तानच्या अल्माटी प्रांतातील कोनाएव्ह शहरातील एका शाळेत ही घटना घडली.
सुट्टीच्या वेळेत जिन्याच्या रेलिंगवरून घसरण्याचा प्रयत्न करताना या मुलाची पकड सैल झाली आणि तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. शाळा प्रशासनाने तातडीने वैद्यकीय मदत बोलावली आणि मुलाला रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कोनाएव्ह शहर शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, शाळेत २०० हून अधिक पाळत ठेवणारे कॅमेरे आहेत आणि सुरक्षेसाठी बसवलेल्या कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड झाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्टंट करताना मुलगा एकटाच होता. कोणीतरी त्याला धक्का दिला, मारहाण केली किंवा शारीरिक हल्ला केला, असे फुटेजवरून दिसत नाही. या व्हिडिओमुळे बहुमजली इमारतींमध्ये विशेषतः जिन्यावर धोकादायक स्टंट करण्याच्या धोक्यांकडे लक्ष वेधले गेले आहे.
पडल्यानंतर, ११ वर्षीय मुलाला गंभीर स्वरूपाच्या मेंदूच्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते, ज्यामुळे डॉक्टरांनी प्रादेशिक, शहर आणि राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची मदत घेतली.
१७ नोव्हेंबर रोजी, त्याचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय पथकांनी तातडीची शस्त्रक्रिया केली. मात्र, अतिदक्षता उपचार आणि शस्त्रक्रियेनंतरही त्याची प्रकृती गंभीरच राहिली. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुःखद घटनेनंतर, अल्माटी प्रांतीय शिक्षण विभागाने मुलाचे कुटुंब, मित्र, वर्गमित्र आणि शिक्षकांप्रती शोक व्यक्त केला.
A sixth-grade boy tried to act cool by sliding down a railing and fell to his death from the third floor. I wonder if the girls remember this guy who was gone with the wind? https://t.co/PUawqKPMD2
— Best James (@imyourpopsi) November 24, 2026
या अपघातामागील परिस्थिती शोधून काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून अधिकारी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित शाळेतील सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करतील अशी शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील मुलांच्या सुरक्षिततेचे महत्त्व आणि जिने, रेलिंग आणि इतर उंच ठिकाणी धोकादायक कृत्य रोखण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे.