देवगड हापूस आंबा एक विशेष स्थान राखतो. त्याची गोड चव, सुगंध, आणि रसाळ फोड यामुळे तो 'आंब्यांचा राजा' म्हणून ओळखला जातो. परंतु, हा अस्सल हापूस ओळखायचा कसा? चला, जाणून घेऊया!
अस्सल देवगड हापूस आंबा पिकल्यावर त्याचा गोडसर, मधाळ सुवास वातावरणात दरवळतो. हा घमघमाट इतका तीव्र असते की, तो लांबूनच ओळखता येते.
अस्सल हापूस आंब्याची साल पातळ आणि मुलायम असते. जो आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे, त्याच्या सालीवर कोणतेही डाग, सुरकुत्या दिसत नाहीत.
आंब्याच्या रंगात देखील फरक असतो. अस्सल देवगड हापूस आंब्याच्या रंगात हिरवा आणि पिवळा या दोन रंगांचा सुंदर मिश्रण दिसतो. त्यात पिवळाधम्मक रंग न दिसता एक नैसर्गिक रंग असतो.
देवगड हापूस आंब्याचा आकार गोलसर, वजनदार असतो. त्याच्या खालच्या टोकाशीही गोलसरपणा असतो. परंतु, दक्षिण भारत, गुजरातमधून आलेले आंबे निमूळते असतात, जे हापूस आंब्यापेक्षा वेगळे असतात.
हापूस आंब्याची फोड इतर आंब्यांच्या फोडीपेक्षा अधिक मोठी आणि रसाळ असते. याच्या रसात तंतूचे प्रमाण अत्यंत कमी असते, ज्यामुळे हापूस आंब्याचा स्वाद अधिक गोड आणि चवदार लागतो.
हापूस आंब्याची चव इतकी गोड, स्वादिष्ट असते की, त्याची तुलना इतर आंब्यांशी करणे कठीण असते. हापूस आंबा वर्षातून काही महिन्यांनाच मिळतो, त्यामुळे तो अधिक खास आणि प्रतीक्षेचा असतो.
देवगडचा अस्सल हापूस आंबा ओळखायचा असेल तर त्याच्या सुगंध, रंग, आकार, साल आणि चवीला महत्व द्या. या गुणांच्या आधारावर तुम्ही खरे अस्सल हापूस आंबा निवडू शकता.