चीनमध्ये सापडला जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा

दक्षिण आफ्रिकेतील साउथ डीप खाणीत सापडलेल्या ९३० मेट्रिक टनांपेक्षा जास्त असलेला हा साठा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असल्याचे म्हटले जात आहे.

बीजिंग: चीनमध्ये जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. मध्य चीनमध्ये हा साठा सापडला आहे. १,००० मेट्रिक टन (१,१०० यूएस टन) उच्च प्रतीचा अयस्क असल्याचा अंदाज आहे, असे चायनीज माध्यमांनी वृत्त दिले आहे. हुनान प्रांतातील भूगर्भशास्त्र ब्युरोच्या ईशान्य भागात असलेल्या पिंगजियांग येथे हा साठा सापडला आहे. चायनीज स्टेट मीडियाच्या मते, या साठ्याची किंमत ६०० अब्ज युआन (६,९१,४७३ कोटी रुपये) आहे.

दक्षिण आफ्रिकेतील साउथ डीप खाणीत सापडलेल्या ९३० मेट्रिक टनांपेक्षा जास्त असलेला हा साठा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असल्याचे म्हटले जात आहे. प्राथमिक पाहणीत २ किलोमीटर खोलीवर ३०० मेट्रिक टन सोन्याच्या ४० शिरा आढळल्या. ३D तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या सखोल पाहणीत आणखी खोलीवर अधिक साठा असल्याचे संकेत मिळाले आहेत. चीनच्या सोन्याच्या उद्योगाला आणि अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळेल, असे म्हटले जात आहे.

साउथ डीप गोल्ड खाण - दक्षिण आफ्रिका, ग्रासबर्ग गोल्ड खाण - इंडोनेशिया, ओलिंपियाड गोल्ड खाण - रशिया, लिहिर गोल्ड खाण - पापुआ न्यू गिनी, नॉर्टे अबियर्तो गोल्ड खाण - चिली, कार्लिन ट्रेंड गोल्ड खाण - यूएसए, बोडिंग्टन गोल्ड खाण - पश्चिम ऑस्ट्रेलिया, एम्पोनेन्ग गोल्ड खाण - दक्षिण आफ्रिका, प्यूब्लो विजो गोल्ड खाण - डोमिनिकन रिपब्लिक, कॉर्टेस गोल्ड खाण - यूएसए ही जगातील सर्वात मोठी सोन्याची खाणी आहेत.

Share this article