Mosquito Free Country: जगातल्या जवळपास प्रत्येक देशात डासांचा त्रास आहे. हे छोटे कीटक फक्त झोपच मोडत नाहीत, तर डेंग्यू आणि मलेरियासारखे आजारही पसरवतात. पण तुम्हाला माहितीये का, जगात असा एक देश आहे जिथे एकही डास नाही?
जगातल्या बहुतांश देशांमध्ये डास आढळतात. नॉर्वे, स्कॉटलंड आणि ग्रीनलँडसारख्या थंड प्रदेशांमध्येही डास आहेत. पण आईसलँड हा जगातला एकमेव असा देश आहे जिथे एकही डास नाही. अंटार्क्टिकामध्येही डास नाहीत, पण तो एक खंड आहे. देशांचा विचार केला तर आईसलँड वेगळा ठरतो. शास्त्रज्ञांच्या मते, यामागचं मुख्य कारण तिथली भौगोलिक परिस्थिती आणि हवामान आहे. आईसलँडच्या चारही बाजूंनी समुद्राचं थंड पाणी असल्यामुळे इतर ठिकाणांहून डासांना तिथे पोहोचणं कठीण जातं. पण डास तिथे कधीच पोहोचले नाहीत असं नाही. यापूर्वी ग्रीनलँडवरून रेक्याविकला जाणाऱ्या विमानात शास्त्रज्ञांना एक डास सापडला होता.
25
आईसलँडमध्ये डास का जगू शकत नाहीत?
आईसलँडमध्ये डासांना अंडी घालण्यासाठी पाणी नाही, असा तुमचा समज असेल तर ते चुकीचं आहे. तिथे अनेक तलाव आणि ओलसर जमिनी आहेत. विमानतळांच्या आजूबाजूलाही पाणी साचतं. तरीही डास तिथे पैदास करू शकत नाहीत.
याचं मुख्य कारण म्हणजे तिथलं पाणी सतत गोठण्याची आणि वितळण्याची प्रक्रिया. डास पाण्यात अंडी घालतात, त्यातून अळ्या बाहेर येतात आणि मग त्यांचे डास होतात. यासाठी पाणी काही काळ द्रव स्वरूपात राहावं लागतं. पण आईसलँडमध्ये वसंत आणि शरद ऋतूत तापमान सतत बदलत असतं. पाणी एकदा गोठलं की थोड्या वेळाने वितळतं आणि पुन्हा गोठतं. या सततच्या प्रक्रियेमुळे डासांची अंडी आणि अळ्या जगू शकत नाहीत. परिणामी ते मोठे डास होण्याआधीच मरून जातात.
35
गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये डास का नसतात?
आईसलँडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे नैसर्गिक गरम पाण्याचे अनेक झरे आहेत. जमिनीखालच्या उष्णतेमुळे काही तलावांमध्ये वर्षभर गरम पाणी असतं. अशा ठिकाणी डास वाढू शकतील असं वाटू शकतं. पण जीवशास्त्रज्ञांच्या मते, तिथली परिस्थितीही डासांसाठी अनुकूल नाही. या गरम पाण्याचं तापमान डासांच्या अळ्या जगू शकतील त्यापेक्षा खूप जास्त असतं. शिवाय, त्या पाण्यात असलेली खनिजे आणि रसायने डासांच्या वाढीसाठी योग्य नसतात. म्हणजे आईसलँडमध्ये सामान्य पाण्यात थंडीचा अडथळा असतो, तर गरम पाण्याच्या तलावांमध्ये जास्त तापमान अडथळा ठरतं. तिथला निसर्गच डासांची वाढ रोखतो.
सध्या आईसलँडमध्ये डास नसले तरी भविष्यात ही परिस्थिती बदलू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. पृथ्वीचं तापमान वाढत असल्यामुळे जगभरातलं हवामान बदलत आहे. आईसलँडमध्येही थंडीची तीव्रता कमी होऊन वसंत आणि शरद ऋतूत तापमान वाढलं, तर डासांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाणी जास्त काळ गोठलं नाही, तर डासांची अंडी आणि अळ्या वाढू शकतील. ही परिस्थिती जास्त काळ राहिली तर तिथे डासांची पैदास होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
हवाई बेटांवरही पूर्वी डास नव्हते. १८२६ मध्ये जहाजांमधून तिथे डास पोहोचले आणि त्यांची संख्या वाढली. अमेरिकेतही हिवाळा उबदार होत असल्यामुळे उष्णकटिबंधीय डास उत्तरेकडे सरकत आहेत, असं संशोधक सांगतात.
55
आईसलँडमध्ये डास आले तरी ते धोकादायक असतील का?
भविष्यात आईसलँडमध्ये डास आले तरी सर्वच प्रकारचे डास तिथे जगू शकणार नाहीत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विशेषतः डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवणाऱ्या 'एडिस' (Aedes) जातीच्या डासांना उष्ण हवामान लागतं. आईसलँडच्या थंड वातावरणात ते जास्त काळ जगू शकत नाहीत. सध्या दक्षिण युरोपमध्ये डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे रुग्ण वाढत असले तरी, उत्तर युरोपमध्ये परिस्थिती बरी आहे. हवामानाच्या मॉडेल्सनुसार, २०८० पर्यंतही उत्तर युरोपमधले काही भाग डेंग्यू पसरवण्यासाठी अनुकूल नसतील.
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.