
थाई गायिका नामखेंग थिप्पावान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. २४ नोव्हेंबर, मंगळवारी थायलंडच्या चोनबुरी प्रांतात झालेल्या तिच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने तिच्याशी कथित गैरवर्तन केले, त्यानंतर तिने त्याच्या थेट चेहऱ्यावर लाथ मारली. हा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत आहे.
एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत, तो चाहता पोलिसांसमोर आणि सुरक्षा रक्षकांसमोर गुडघ्यावर बसलेला दिसत आहे. त्यानंतर ब्रेक दरम्यान गायिका खाली आली आणि तिने थेट त्याच्या तोंडावर लाथ मारली. लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान या व्यक्तीने तिच्या छातीला हात लावल्याचा आरोप करत नामखेंगने त्याला जाब विचारला.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर, शनिवारी गायिका आणि ती व्यक्ती बान बुएंग पोलीस ठाण्यात भेटले. तिथे दोघांनी आपसात तडजोड केली आणि एकमेकांना माफ केले. नामखेंग थिप्पावानने त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर थायलंडच्या दंड संहितेच्या कलम ३९१ अंतर्गत पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या संमतीने त्याला दंड ठोठावला.
थाई गायिका नामखेंग थिप्पावान ही चोनबुरी प्रांतातील बान बुएंग जिल्ह्यात लॉय क्राथोंग महोत्सवाच्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होती. तिथे तिचे हजारो चाहते तिच्या गाण्यांचा आनंद घेण्यासाठी आले होते.
मात्र, या कार्यक्रमात एका अनुचित घटनेने गालबोट लावले. गर्दीतल्या एका पुरुष चाहत्याने स्टेजच्या जवळ जाऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. यामुळेच ही धक्कादायक घटना घडली जी कॅमेऱ्यात कैद झाली. व्हायरल व्हिडिओत, गायिका तिचे गाणे संपवून खाली उतरताना आणि सुरक्षारक्षकांनी पकडून ठेवलेल्या त्या आरोपी फॅनला जाब विचारताना दिसत आहे.
थाई गायिकेने आरोपीला जाब विचारताना थेट त्याच्या चेहऱ्यावर लाथ मारली. त्यानंतर तिचे मॅनेजर वुटिचाई 'ओई' सोनवियांग यांनी मध्यस्थी करत तिला मागे खेचले आणि पोलिसांना परिस्थिती हाताळू दिली.
Thai singer “Namsang Thipawan” Bwas groped by a man at a concert in Ban Bueng in Chon Buri Province
Before police could restrain him, he bowed and apologized, only to be kicked full force in the face by the pissed off singer
I reckon he deserved it! https://t.co/Lf5lXlx0oL
— James Goddard (@JamesPGoddard90) November 25, 2026
नामखेंग थिप्पावानचे मॅनेजर वुटिचाई 'ओई' सोनवियांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते परफॉर्मन्सचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना त्यांनी त्या व्यक्तीला गायिकेशी गैरवर्तन करताना पाहिले.
त्यांनी लगेच त्या व्यक्तीला जाब विचारला आणि सुरक्षा रक्षकांना बोलावून त्याला पकडून दिले. मॅनेजरने सांगितले की त्यांनी पुराव्यासाठी ही घटना रेकॉर्ड करून ठेवली आहे.
चोनबुरी प्रांतातल्या बान बुएंग जिल्ह्यात झालेल्या कॉन्सर्टमधील कथित गैरवर्तनानंतर नामखेंग थिप्पावानने एक कडक विधान केले. ती म्हणाली, फक्त स्टेजवर उभे आहेत म्हणून कलाकारांनी लैंगिक छळ सहन करावा असे नाही.
तिने मान्य केले की तिच्या प्रतिक्रियेवर टीका होऊ शकते, पण तिने स्पष्ट केले की कुणीही सार्वजनिक व्यक्ती असली तरी तिच्या परवानगीशिवाय तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा कुणालाही अधिकार नाही आणि फक्त माफी मागितल्याने केलेला छळ मिटत नाही.
"मला माफ करा, पण मला खरंच राहवलं नाही. इतकी हिंमत की वर येऊन माझ्या छातीला हात लावला," असे थाई गायिकेने सोशल मीडियावर लिहिले.
"फक्त स्टेजवर आहेत म्हणून कोणत्याही कलाकाराने लैंगिक छळ सहन करण्याची गरज नाही. सार्वजनिक व्यक्ती असण्याचा अर्थ असा नाही की कुणालाही तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करण्याचा अधिकार मिळतो. फक्त माफी मागितल्याने केलेला छळ नाहीसा होत नाही," असे ती पुढे म्हणाली.
दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी बान बुएंग पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवल्यानंतर, नामखेंग थिप्पावानशी गैरवर्तन करणाऱ्या त्या व्यक्तीला थायलंडच्या दंड संहितेच्या कलम ३९१ अंतर्गत पोलिसांनी दंड ठोठावला.