
फ्रान्समधील एका एअरपोर्टचा व्हायरल व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विमानातून प्रवाशांचे सामान बाहेर काढताना एअरपोर्टचे कर्मचारी बॅगा थेट कन्व्हेयर बेल्टवर फेकत असल्याचे यात दिसते. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सामानाच्या सुरक्षिततेबद्दल नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे. विमान लँड झाल्यानंतर काही वेळातच एका प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. यात ग्राउंड स्टाफ विमानातील कार्गो होल्डमधून सामानाच्या बॅगा बाहेर काढत आहेत. पण या बॅगा कन्व्हेयर बेल्टवरून वेगाने खाली आदळताना दिसत आहेत. त्यांना सांभाळण्यासाठी किंवा हळूवार खाली ठेवण्यासाठी तिथे कोणीही कर्मचारी हजर नसल्याचे स्पष्ट दिसते.
कन्व्हेयर बेल्टवरून येताना अनेक बॅगा एकमेकांवर आदळत आहेत, घसरत आहेत आणि उडत आहेत. यावरून प्रवाशांचे सामान पडद्यामागे किती काळजीपूर्वक हाताळले जाते, यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, चेक-इन केलेल्या सामानाची काळजी न घेण्याच्या या प्रकारावर सर्वत्र टीका होत आहे.
⚫️ Fransa’da bir havalimanına iniş yapan kişi, yolcuların valizlerinin uçaktan indirildiği anları paylaştı. https://t.co/vRQfln79zN
— SİYAH SANCAK (@siyahsancakx) November 28, 2026
अनेक युजर्सनी कर्मचाऱ्यांच्या या बेफिकीरपणावर तीव्र टीका केली आहे. बॅगांमध्ये कधीकधी मौल्यवान किंवा सहज तुटू शकतील अशा वस्तू असतात, त्यामुळे बॅगेज हँडलर्सनी जास्त काळजी घ्यायला हवी, असे युजर्सचे म्हणणे आहे. तर काहींनी प्रश्न विचारला आहे की, कन्व्हेयर बेल्टवरून बॅगा खाली येत असताना त्यांना सांभाळण्यासाठी तिथे ग्राउंड स्टाफ का नव्हता.
दुसरीकडे, काही युजर्सनी यावर गमतीदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. विमानातून सामान उतरवले जात नसून या बॅगा जणू रोलर-कोस्टर राईडची मज्जा घेत आहेत, असा टोला एकाने लगावला आहे.