विनेश फोगटने रचला इतिहास - पदक निश्चित, हॉकीमध्ये भारताचा जर्मनीकडून पराभव

विनेश फोगट आणि नीरज चोप्रा यांची अंतिम फेरीतील स्थानामुळे भारताच्या पदकाच्या आशा कायम आहेत, तर हॉकी संघाच्या पराभवामुळे त्यांना ब्राँझपदकासाठी स्पर्धा करावी लागेल.

vivek panmand | Published : Aug 7, 2024 2:56 AM IST / Updated: Aug 07 2024, 08:27 AM IST

पॅरिसमधील ऑलिम्पिकचा 11 वा दिवस भारतासाठी खास होता. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकच्या कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. गेल्या वेळी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारत आणि जर्मनी यांच्यात मंगळवारी हॉकी उपांत्य फेरीचा सामना झाला. या सामन्यात जर्मनीने भारताचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारताची ब्राँझपदकासाठी स्पेनशी स्पर्धा होणार आहे.

विनेश फोगटचे पदक निश्चित झाले

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने 50 किलो वजनी गटात पदक निश्चित केले आहे. अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश ही पहिली महिला कुस्तीपटू आहे. तिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव केला. विनेशचा अंतिम सामना बुधवारी होणार आहे.

ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाला

भारत आणि जर्मनी यांच्यातील हॉकी उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीने भारताचा 3-2 असा पराभव केला. आता अंतिम फेरीत नेदरलँडचा सामना जर्मनीशी होणार आहे. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने ७व्या मिनिटाला गोल नोंदवत १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र 18व्या मिनिटाला गोन्झालो पेइलाटने गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. 27व्या मिनिटाला जर्मनीने मोठी आघाडी घेतली. क्रिस्टोफर रुहरने गोल करून जर्मनीला २-१ ने आघाडीवर नेले. मात्र, 36व्या मिनिटाला सुखजीतने शानदार गोल करून सामना पुन्हा 2-2 असा बरोबरीत आणला. पण खेळ संपण्याच्या ६ मिनिटे अगोदर म्हणजेच ५४ व्या मिनिटाला मार्को मिल्टकाऊने गोल करून जर्मनीला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. भारताने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले मात्र एकही गोल होऊ शकला नाही आणि त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्या.

नीरज चोप्राने अंतिम फेरी गाठली, सुवर्णपदकाची आशा

नीरज चोप्राने मंगळवारी 89.34 मीटर फेक करून पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 26 वर्षीय नीरज चोप्राने मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकमध्ये 88.36 मीटरची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली होती. जून 2022 मध्ये स्वीडनमध्ये झालेल्या स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये त्याने 89.94 मीटर फेक करून हा विक्रम केला होता. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

Share this article